संतापजनक ! काळोखात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:17+5:302021-01-18T04:09:17+5:30
अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : आयुष्याचा शेवट मृत्यूने होतो. मृत्यू ओढवला की मग सुरू होते स्मशानभूमीची वाट. ...
अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : आयुष्याचा शेवट मृत्यूने होतो. मृत्यू ओढवला की मग सुरू होते स्मशानभूमीची वाट. या वाटेवरही आप्तस्वकीयांना दु:ख आणि यातना मिळत असतील तर त्यापेक्षा दुसरे दुर्दैव तरी कोणते म्हणावे! होय, चक्क काळोखातच अंत्यसंस्कार उरकविण्याचा दुर्दैवी प्रकार उमरेडच्या वेकोलि आमनदी स्मशानभूमीवर बघावयास मिळत आहे.
अंत्यविधीसाठी उमरेड आमनदी स्मशानभूमीवर थोडा जरी विलंब झाला तर या घाटावर कोणत्याही प्रकारची विद्युत सुविधा उपलब्ध नाही. मागील अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. अशावेळी चारचाकी वाहने सुरू करीत अथवा मोबाईल टॉर्चचा वापर करीत अंत्यसंस्कार कसेबसे उरकवावे लागतात. हा प्रकार संतापजनक असला तरी या गंभीर समस्येकडे अद्याप तरी कुणीही गांभीर्याने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
उमरेड शहरामध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे. वेकोलि आमनदी, कुही मार्गावर आमनदीलगत आणि भिवापूर मार्गावर अंत्यसंस्काराचे विधी पार पडत असतात. साधारणत: अधिकांश अंत्यसंस्कार वेकोलि आणि भिवापूर मार्गावरील स्मशानभूमीवर होतात. अशावेळी वेकोलि आमनदी स्मशानभूमीवर अंत्यसंस्काराला सूर्य मावळतीला आलाच तर चांगलीच गैरसोय होत असते. महामार्गावरून काही अंतरावरच असलेल्या स्मशानभूमीपर्यंत काळोख असतो. स्मशानभूमी परिसरातसुद्धा विद्युत उपलब्ध नसल्याने चारचाकी वाहन ज्यांनी आणले ते कसेबसे वाहनांचा ‘हेडलाईट’ सुरू करतात. अनेक जण मोबाईल टॉर्च सुरू करतात. कसाबसा काळोखात अंत्यविधी उरकविला जातो. मागील अनेक वर्षांपासून या समस्येकडे कुणी ढुंकूनही बघितले नाही, हे येथे उल्लेखनीय.
.....
उजेड कोण पाडणार?
मागील अनेक वर्षांपासून आमनदी घाट कुणाच्या अखत्यारित आहे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. वायगाव घोटुर्ली ग्रामपंचायत आणि उमरेड नगरपालिका एकमेकांच्या हद्दीत स्मशानभूमी असल्याचे सांगतात. सिमेंटचे रस्ते वायगाव घोटुर्ली तर आसनव्यवस्था आणि उर्वरित काही कामे नगरपालिकेने केली आहेत. आता स्मशानभूमीतील अंधार नाहीसा करण्यासाठी पाऊल कोण उचलणार आणि स्मशानभूमीत उजेड कोण पाडणार, असा सवाल विचारला जात आहे.
अमानवीय प्रकार
शनिवारी (दि.१६) उमरेड कावरापेठ येथील वैशाली भट यांचे निधन झाले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी आप्तस्वकीय पोहोचले. सर्वत्र काळोख असल्याने चांगलीच गैरसोय झाली. सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार काळोखातच उरकविले जावे, हा प्रकार अमानवीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.