नागपुरात आणखी १८ पॉझिटिव्ह : एकाच दिवसात ५३ रुग्ण घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:47 PM2020-05-15T23:47:12+5:302020-05-15T23:51:57+5:30
कोविड रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ५३ रुग्णांना सुटी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) ५३ रुग्णांना सुटी दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब असलीतरी पुन्हा १८ नव्या रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह कोरोनाबधितांची संख्या ३३६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, टिमकी भानखेडा येथून तब्बल १२ रुग्णांची नोंद झाली. यातील एक रुग्ण क्वारंटाईन नसल्याने व हंसापुरी या नव्या वसाहतीतूच चार रुग्णांचे निदान झाल्याने परिसरात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुग्णांच्या सुधारीत डिस्चार्ज धोरणाचा फायदा मेयो, मेडिकलला होऊ लागला आहे. गुरुवारी मेडिकलने २१ तर आज मेयोने ५३ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने हे दोन्ही रुग्णालय अर्धे रिकामे झाले आहे. येथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा भार काहिसा कमी झाला आहे. मेयोमधून सुटी देण्यात आलेल्या कोरोनामुक्तांमध्ये २१ पुरुष व ३२ महिला आहेत. यात मोमीनपुरा येथील १८ पुरुष तर २० महिला आहेत. सतरंजीपुरा येथील दोन पुरुष तर ११ महिला आहेत. या शिवाय मोठा ताजबाग येथील डॉक्टर महिला व जरीपटका येथील एक पुरुषाचा समावेश आहे. मेयोतून आतापर्यंत ११० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरात एकूण १९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हंसापुरीत पहिल्यांदाच चार रुग्णांची नोंद
मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या टिमकी भानखेडा येथील ११ रुग्णांमध्ये २३,२६,२७, ३३,४२,४३,४५,५२,५३,५६ व ५९ वर्षीय सर्व पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण सिम्बॉयसीस येथे क्वारंटाईन होते. केवळ गोळीबार चौक टिमकी भानखेडा येथील २२ वर्षीय युवक गुरुवारी स्वत:हून मेयोत भरती झाला. त्याचाही नमुना पॉझिटिव्ह आल्याने या वसाहतीत आणखी रुग्ण असण्याची शक्यता आहे. नीरीच्या प्रयोगशाळेत चार पॉझिटिव्ह रुग्ण आले. हे सर्व रुग्ण हंसापुरी येथील आहेत. यात २१,३० व ५९ वर्षीय पुरुष तर ३०वर्षीय महिला आहे. हे सर्व रुग्ण व्हीएनआयटीमध्ये क्वारंटाईन होते. पहिल्यांदाच या वसाहतीतील रुग्णांची नोंद झाली. मोमीनपुरा येथून त्यांना लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेडिकलमध्ये काल रात्री सतरंजीपुरा येथील २०वर्षीय युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला तर आज सकाळी गड्डीगोदाम येथील ६५वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला. असे एकूण आज १८ रुग्णांची भर पडली.
‘सारी’ रुग्णाचा मृत्यू
पारडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू झाला. ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चा रुग्ण म्हणून १४ मे रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. कोविड संशयित म्हणून नमुना तपासला असता तो निगेटिव्ह आला. या दोन महिन्यात मेडिकलमध्ये सारीचा हा दुसरा मृत्यू आहे. गड्डीगोदाम येथील ६५ वर्षीय सारीचा रुग्ण १३ मे पासून मेडिकलमध्ये उपचार घेत आहे. यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यांची प्रकृती गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज मेडिकलमध्ये ‘सारी’चे चार रुग्ण भरती झाले असून एकूण १२ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ८१
दैनिक तपासणी नमुने ३३१
दैनिक निगेटिव्ह नमुने ३१३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३३६
नागपुरातील मृत्यू ०४
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १९३
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १९१९
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७६०
पीडित-३३६-दुरुस्त-१९३-मृत्यू-०४