CoronaVirus in Nagpur : आणखी ३८ पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या २६८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:44 PM2020-05-07T23:44:50+5:302020-05-07T23:54:30+5:30
नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवसांचा कालावधी लागला, परंतु दुसऱ्या शंभरीसाठी केवळ तेराच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, बुधवारी ६८ तर आज ३८ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २६८वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवसांचा कालावधी लागला, परंतु दुसऱ्या शंभरीसाठी केवळ तेराच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, बुधवारी ६८ तर आज ३८ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २६८वर पोहचली आहे. यात तीन मृत्यूंची नोंद आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६५ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी दिवसा ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर रात्री मेडिकलच्या प्रयोगशाळेत २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली. एकाच दिवशी ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात रुग्णांची संख्या २३०वर पोहचली होती. आज गुरुवारी मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २२, नीरीच्या प्रयोगशाळेतून सहा, मेयोच्या प्रयोगशाळेतून सात व माफसुच्या प्रयोगशाळेतून तीन असे एकूण ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गेल्या दोन दिवसांत १०६ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. त्यानंतर शंभराव्या रुग्णाची नोंद २४ एप्रिल रोजी झाली. पहिले शंभर रुग्ण गाठायला ४४ दिवस लागले. मात्र २५ एप्रिल ते सहा मे या १३ दिवसांत दुसऱ्या शंभर रुग्णांची नोंद झाली. यावरून रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुढील काही दिवस नागपूरकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले बहुसंख्य रुग्ण हे मोमिनपुरा व सतरंजीपुऱ्यातील आहेत. हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणातील आहेत.
सारीचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह
‘सारी’ म्हणजे तीव्र श्वसनाचे विकार असलेला रुग्ण. याला वैद्यकीय भाषेत ‘ सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणतात. या आजाराचे तीन रुग्ण गेल्या काही दिवसांपासून मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. आज या तिन्ही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सारीच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेने कमी असल्याने ‘हायरिस्क’ रुग्ण म्हणून त्याकडे पाहिले जाते.
सर्वाधिक रुग्ण मोमिनपुऱ्यातील
मिळालेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या ३८ रुग्णांमध्ये मेडिकलमधील १९, मेयोतील सात तर माफसुमधील तीन असे एकूण ६० रुग्ण आहेत. केवळ नीरी येथील सहा रुग्ण हे सतरंजीपुऱ्यातील आहेत. पार्वतीनगर येथील कोरोनाबाधित मृताच्या नातेवाईकांच्या नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.
दोन रुग्ण कोरोनामुक्त
मोमिनपुरा येथील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाचा नमुना १४ दिवसांनंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना मेयो रुग्णालयातून सुटी देण्यात आली. २४ एप्रिल रोजी त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मेयोमध्ये उपचार सुरू होते. मेडिकलमधीलही एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित २१५
दैनिक तपासणी नमुने १८०
दैनिक निगेटिव्ह नमुने ११३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने २६८
नागपुरातील मृत्यू ०३
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६५
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १,५८६
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,०८९
पीडित-२६८-दुरुस्त-६५-मृत्यू-३