खुनी व ब्लॅकमेलर अमित साहूच्या आणखी एका साथीदाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 11:22 AM2023-08-22T11:22:30+5:302023-08-22T11:24:26+5:30
सना खानच्या मोबाईलमध्ये दडली आहेत ‘रहस्य’ ‘सेक्सटॉर्शन रॅकेट’च्या अनेक क्लिपिंग्ज लपविल्याचा पोलिसांना संशय
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांची हत्या करणाऱ्या अमित साहूच्या आणखी एका सहकाऱ्याला जबलपूरमधून अटक करण्यात आली आहे. कमलेश पटेल असे संबंधित आरोपीचे नाव असून त्याने सना खानचे मोबाईल नष्ट केल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहेत. आता खरोखरच त्याने मोबाईल नष्ट केले आहे की कुठे लपवून ठेवले आहेत, यावर पोलिस तपास करत आहेत. दरम्यान अमित साहू याने ‘हनीट्रॅपिंग’च्या माध्यमातून ‘सेक्सटॉर्शन’च्या रॅकेटसाठी अनेकांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो जमा केले होते. तो डेटादेखील सना खान यांच्या मोबाईलमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींनी अनेक क्लिपिंग्ज सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे.
सना खान हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी व जबलपूर येथील कुख्यात गुन्हेगार अमित ऊर्फ पप्पू साहू आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अमित साहूसह धर्मेंद्र यादव नावाच्या गुन्हेगारालाही शनिवारी अटक करण्यात आली होती. अमित साहूने जबलपूर आणि नागपूर येथील त्याच्या साथीदारांच्या मदतीने एका ३५ वर्षीय पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती व तिच्यावर दबाव टाकून त्याने तिला अनेक ओळखीच्या लोकांकडे पाठविले. तेथे त्याने तिला त्यांच्यासोबत अश्लील व्हिडीओ व फोटो काढायला लावले. त्या फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून अमित साहूने नागपुरातील अनेकांना बदनामीची भीती दाखवून ब्लॅकमेल केले व पैसे उकळले.
अशा पद्धतीने आरोपींनी नागपुरातील अनेकांना गंडा घातला. या रॅकेटमधील काही व्हिडीओ व फोटो सना खान यांच्या मोबाईलमध्ये होते. अमित साहूने सना यांची हत्या केल्यावर त्यांचा मृतदेह हिरन नदीत फेकला. त्यानंतर साहूचा मित्र धर्मेंद्र यादव याच्या सांगण्यावरून त्याचा सहकारी कमलेश पटेलने सना खान यांचे मोबाईल नर्मदा नदीत फेकले. त्याने एक मोबाईल विहिरीत लपविला होता. मात्र त्यात फारसा डेटा मिळालाच नाही.
कोण आहे कमलेश पटेल ?
कमलेश पटेल हा जबलपूरमधील गुंड असून तो धर्मेंद्र यादवचा उजवा हात मानला जातो. रेती तस्करी व इतर अवैध कामांमध्ये तो गुंतलेला आहे. धर्मेंद्रच्या सांगण्यावरून त्याने अनेक गुन्हे केले आहेत. तो धर्मेंद्रच्या माध्यमातून साहूच्या संपर्कात आला होता. या हत्येनंतर कमलेश पटेलने सेक्सटॉर्शन रॅकेटमधील क्लिपिंग्ज सुरक्षित ठिकाणी स्टोअर करून सना खानचे मोबाईल नष्ट केल्याचा पोलिसांना संशय आहे.
आरोपींच्या बॅंक खात्याचे मागविले तपशील
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात अमित साहू, धर्मेंद्र यादव, जितेंद्र गौड व कमलेश पटेल यांचा समावेश आहे. सेक्सटॉर्शन रॅकेटच्या माध्यमातून साहू व त्याच्या टोळीने महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील राजकारणी, व्यापाऱ्यांना लुबाडले आहे. या रॅकेटमधील काही पैसा यूपीआयच्या माध्यमातून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपींची खाती असलेल्या बॅंकांना पत्र लिहून सविस्तर तपशील मागविले आहेत.