खुनातील आणखी एका आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:18+5:302021-07-27T04:09:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विशाल चरण धुर्वे, रा. चित्तरंजन नगर, कामठी याचा उपचारादरम्यान मृत्यू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विशाल चरण धुर्वे, रा. चित्तरंजन नगर, कामठी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून रविवारी (दि. २५) चाैघांना भिलाई (छत्तीसगड) येथून अटक केली तर अन्य एका आराेपीस रविवारी रात्री वर्धा शहरातून अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आराेपींची संख्या पाच झाली आहे.
कामठी (नवीन) पाेलिसांनी गगन नागराज थूल (२६), अक्षय ऊर्फ दादू राजू गडकरी (२२), शिवम प्रकाश उके (२१) व शेख जाकीर शेख साबिर (२२) सर्व रा. चित्तरंजन नगर, झोपडपट्टी, कामठी यांना भिलाई येथून तर आसिफ शेख यास वर्धा शहरातून अटक केली. या पाचही जणांनी विशालला शनिवारी (दि. १७) रात्री जबर मारहाण केली हाेती. त्याचा शनिवारी (दि. २४) नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून नव्याने तपासाला सुरुवात केली.
या पाचही आराेपींना साेमवारी (दि. २६) कामठी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी. आर. भोला यांच्या न्यायालयासमाेर हजर केले हाेते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची (गुरुवार, दि. २९) पाेलीस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणात आराेपींची संख्या वाढण्याची शक्यताही पाेलिसांनी व्यक्त केली आहे.
...
दाेन दिवसानंतर अंत्यसंस्कार
खुनाचा गुन्हा नाेंदवून आराेपींना जाेपर्यंत अटक केली जात नाही ताेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका मृत विशाल धुर्वेच्या कुटुंबीयांनी घेतल्याने पेच निर्माण झाला हाेता. त्यामुळे त्याची उत्तरीय तपासणी प्रक्रियाही थांबविण्यात आली हाेती. आराेपींना रविवारी अटक केल्यानंतर साेमवारी सकाळी त्याच्यावर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणी प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर कामठी येथील राणी तलाव माेक्षधाम येथे पाेलीस बंदाेबस्तात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.