नागपुरातील नवोदय बँक घोटाळ्यात आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:42 PM2019-10-18T23:42:23+5:302019-10-18T23:43:31+5:30
नवोदय बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका वठविणारा आरोपी समीर भास्करराव चट्टे (वय ४८, रा. नटराज टॉकीजमागे, महाल, नागपूर) याच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक पथकाने मुसक्या बांधल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेकडो ठेवीदारांची रोकड गिळंकृत करण्यास संचालक मंडळाला हातभार लावणारा आणि नवोदय बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका वठविणारा आरोपी समीर भास्करराव चट्टे (वय ४८, रा. नटराज टॉकीजमागे, महाल, नागपूर) याच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक पथकाने मुसक्या बांधल्या.
आरोपी चट्टे हा नवोदय बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सन २००७ ते २०१२ या कालावधीत कार्यरत होता. त्याने पोलिसांच्या लेखी आता फरार असलेले आरोपी सचिन मित्तल आणि बालकिशन गांधी यांच्या ग्लॅडस्टोन समूहास, हिंगल समूहास, जोशी तसेच झाम समूहाला कर्जफेडीची क्षमता न तपासता कोट्यवधींचे कर्ज दिले होते. आरोपींनी तारण ठेवलेल्या मालमत्तेची पडताळणी न करता बँकेचे अध्यक्ष अशोक धवड तसेच संचालक मंडळातील काही आरोपींशी संगनमत करून आरोपींनी अनेक कर्जदारांना बँकेच्या एक्सपोजर लिमिटपेक्षा अधिक जास्त कर्ज मंजूर केले. अशा प्रकारे बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाशी संगनमत करून आरोपी चट्टेने ३८ कोटी, ७५ लाखांचा घोटाळा केला. त्यामुळे नवोदय बँक बुडाली आणि अनेक ठेवीदारांची आयुष्याची कमाईही बुडाली. लेखा परीक्षणातून हा घोटाळा उघड झाल्यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आतापावेतो कुख्यात बिल्डर हेमंत झाम, त्याचा काका मुकेश झाम, मुकेशची पत्नी तसेच नातेवाईक यौवन गंभीर अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष धवड आणि अन्य काही आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यातील समीर चट्टे हा गुरुवारी रात्री घरी परतल्याचे कळताच गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, ईओडब्ल्यूच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत माने आणि सहकाऱ्यांनी समीर चट्टेच्या घरी छापा मारून त्याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याचा २२ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.
स्वत:चीही तुंबडी भरली
समीर चट्टेने बँकेच्या घोटाळ्यात हातभार लावताना स्वत:च्या पदाचा दुरुपयोग करून ३० नोव्हेंबर २००९ रोजी स्वत:चा प्लॉट खरेदी करण्यासाठी साडेसात लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतले. बदल्यात कोणतीही मालमत्ता गहाण ठेवली नाही आणि नंतर कर्जाची रक्कमही फेडली नाही. आजघडीला त्याच्यावर बँकेच्या कर्जाची रक्कम शिल्लक आहे.