वाघिणीचा दुसराही बछडा मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:02+5:302021-03-21T04:08:02+5:30

नागपूर : कऱ्हांडलाच्या जंगलात १६ मार्चला दुपारी कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेला वाघिणीचा बछडा अखेर जंगलात मृतावस्थेत आणि हिस्त्र प्राण्यांनी खाल्लेल्या ...

Another calf of Waghini was found dead | वाघिणीचा दुसराही बछडा मृतावस्थेत आढळला

वाघिणीचा दुसराही बछडा मृतावस्थेत आढळला

Next

नागपूर : कऱ्हांडलाच्या जंगलात १६ मार्चला दुपारी कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेला वाघिणीचा बछडा अखेर जंगलात मृतावस्थेत आणि हिस्त्र प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळला. हा बछडा टी-१ वाघिणीचा असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. १६ मार्चलाच भटकणाऱ्या तिसऱ्या बछड्याचेही पगमार्क दिसले होते, मात्र त्याचाही शोध वनविभाग लावू शकला नाही. यामुळे व्याघ्रप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्या अंतर्गत कऱ्हांडला नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३६३ मध्ये गस्तीदरम्यान वनरक्षकांना हा वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला. त्याच्या शरीराचा मानेवरील भाग हिंस्त्र वन्यप्राण्यांनी खाल्लेला होता. परिस्थितीवरून तो वन्यप्राण्यांच्या तावडीत सापडून मरण पावला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. हा बछडा या टी-१ वाघिणीचा असून तिला तीन बछडे होते. मात्र पिलांना सोडून ती मागील काही दिवसांपासून सूर्या (टी-९) या वाघासोबत याच परिसरात फिरत असल्याचे आढळले आहे. याचदरम्यान सूर्या वाघाने गेल्या आठवड्यात एका बछड्याला ठार केले होते. त्यानंतर ही दोन्ही पिले आईपासून विभक्त होऊन जंगलात भटकत होती. वाघाचे बछडे किमान वर्षभर आपल्या आईसोबत राहून शिकारीचे तंत्र अवगत करतात. मात्र ही पिले फक्त सहा ते सात महिन्यांचीच होती. त्यांना शिकार करता येत नव्हती. यामुळे त्यांच्या जीवित्वाचा धोका अधिकच वाढला होता. त्यांच्या शोधाचे आवाहन वनविभागापुढे असतानाच १६ मार्चला हा बछडा अगदी अशक्त आणि दुबळ्या अवस्थेत कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळला होता. आत्यंतिक भुकेने तो खंगल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसत होते. यालाही सूर्या या वाघानेच मारले असावे, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या या बछड्याचे शवविच्छेदन आणि अन्य कायदेशीर सोपस्कार केले जात आहेत.

...

आता तिसऱ्याला तरी शोधणार का ?

तिसऱ्या बछड्याचे फक्त पगमार्क दिसले होते. त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. यामुळे त्याचे नमके काय झाले असावे, हा प्रश्न वन्यजीव प्रेमींना अस्वस्थ करीत आहे. वाघिणीपासून विभक्त झालेल्या तीनपैकी दोन बछडे मृत्यूनंतरच आढळले. उपाशीपोटी जंगलात फिरणाऱ्या बछड्यांना वनविभाग शोधू न शकल्याने या विभागाच्या कार्यबद्धतीबद्दल वन्यजीवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता निदान तिसऱ्याला तरी सुरक्षित शोधणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

...

Web Title: Another calf of Waghini was found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.