अवैध सावकार सागर दोशी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: August 2, 2024 03:21 PM2024-08-02T15:21:50+5:302024-08-02T15:23:59+5:30
Nagpur : दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी देत अव्वाच्या सव्वा पैसे वसूल
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनमानी पद्धतीने व्याज आकारणी करत कर्जदाराला मुलांच्या किडन्या विकून पैसे वसूल करेन अशी धमकी देणाऱ्या अवैध सावकाराविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात त्याने कर्जदाराला जीवे मारण्याची धमकी देत अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले व शेतीचे विक्रीपत्र स्वत:च्या नावे करून घेतले. अंबाझरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज नायडू (५७, टिकेकर रोड, धंतोली) यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी १ मार्च २०१६ ते १२ फेब्रुवारी २०२० या कालावधीत अवैध सावकार सागर जयेंद्रकुमार दोशी (३५, नरेंद्रनगर) याच्याकडून अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओंकार भवन येथे १० टक्के व्याजाने १३ लाख रुपये घेतले होते. त्याने त्यावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारायला सुरुवात केली. त्याने नायडू यांना जीवे मारण्याची धमकी देत अतिरिक्त पैशांची मागणी केली. दबाव आणून त्याने त्यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून साडेपंधरा लाख व रोख १०.७८ लाख घेतले. त्यानंतर व्याजाचे १२ लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगत त्याने नायडू यांची वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शेती गहाण ठेवायची आहे असे खोटे सांगत त्यांच्या शेतीचे विक्रीपत्र स्वत:च्या नावे करून घेतले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यात १० लाख रुपये जमा केले व धमकी देत ते रोख माध्यमातून त्यांच्याकडून घेतले. नायडू यांचे धंतोलीतील घर गहाण ठेवण्यासाठी त्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत अनेक धमक्या दिल्या. अखेर नायडू यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेत आपबिती मांडली होती. नायडू यांच्या तक्रारीवरून दोषीविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम २९४, ५०६(बी), ३८४, ३८५, ३८६, ३८७, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.