पटोले-वंजारी आणि साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:17 PM2019-05-27T22:17:30+5:302019-05-27T22:18:26+5:30
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत वारंवार अडथळे आणण्याचे प्रयत्न आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे नागपूरचे लोकसभा उमेदवार नाना पटोले तसेच अभिजित वंजारी आणि काँग्रेसच्या १० ते १५ कार्यकर्त्यांविरुद्ध कळमना पोलिसांनी पुन्हा एक कलम वाढविले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे २३ मेच्या रात्री दिलेल्या तक्रारीवरून ही घडामोड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत वारंवार अडथळे आणण्याचे प्रयत्न आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे नागपूरचे लोकसभा उमेदवार नाना पटोले तसेच अभिजित वंजारी आणि काँग्रेसच्या १० ते १५ कार्यकर्त्यांविरुद्ध कळमना पोलिसांनी पुन्हा एक कलम वाढविले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे २३ मेच्या रात्री दिलेल्या तक्रारीवरून ही घडामोड झाली आहे.
गुरुवारी २३ मे रोजी कळमना यार्ड येथे नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. मतमोजणीदरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा आक्षेप घेतले. त्या आक्षेपांचे निराकरणही करण्यात आले. परंतु विविध कारणे सांगून तक्रारीच्या नावावर मतमोजणीत अडथळे आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. स्वत: काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशांत पवार यांनी तक्रारीच्या नावाखाली निवडणूक अधिकाऱ्यांसह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. घोषणा दिल्या. त्यामुळे मतमोजणीत अनेकदा अडथळा निर्माण झाला. परिणामी, मतमोजणीला उशीर झाला. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून रात्री उशिरापर्यंत हे प्रकार सुरू होते. काँग्रेसकडून घेतले जात असलेले प्रत्येक आक्षेप आणि तक्रारीचे निराकरण केले जात असूनही जाणीवपूर्वक मतमोजणीत वारंवार अडथळे आणले जात होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. ते गोंधळ घालण्याच्या उद्देशाने अडथळे आणत होते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांच्यातर्फे श्रीधर राजमाने यांनी कळमना पोलिसात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नाना पटेले, अभिजित वंजारी, बंटी शेळके, प्रशांत पवार व इतरांविरुद्ध भादंवि १८८, तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुन्हा पटोले, वंजारी आणि काँग्रेसच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी असभ्य वर्तन करून घोषणाबाजी केल्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र) यांच्यातर्फे तहसीलदार सुधाकर इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त गुन्ह्यात कलम १७१ एफ अन्वये वाढ करण्यात आली.
पटोले-वंजारी आणि साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
कलम १७१ एफमधील शिक्षेची तरतूद
कळमना पोलिसांनी वाढविलेल्या या गुन्ह्यात दोष सिद्ध झाल्यास संबंधित गैरअर्जदाराला एक ते तीन वर्षांपर्यंतची शिक्षा न्यायालयाकडून सुनावली जाऊ शकते, असे कळमन्याचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण यांनी सांगितले.