नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 10:09 PM2018-05-03T22:09:01+5:302018-05-03T22:19:40+5:30
स्थापनेची १४ वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरकर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.फडणवीस यांच्यावर विद्यापीठ वर्तुळातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यातील तीन महत्त्वाच्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदी नागपूरकर कुलगुरू असून आता डॉ. फडणवीस यांच्या निवडीमुळे शिक्षणक्षेत्रात नागपूरची मान आणखी उंच झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थापनेची १४ वर्षे पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नागपूरकर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण व प्रशासकीय क्षेत्रात कार्य करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या डॉ.फडणवीस यांच्यावर विद्यापीठ वर्तुळातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यातील तीन महत्त्वाच्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदी नागपूरकर कुलगुरू असून आता डॉ. फडणवीस यांच्या निवडीमुळे शिक्षणक्षेत्रात नागपूरची मान आणखी उंच झाली आहे.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गुरुवारी डॉ.मृणालिनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. डॉ.फडणवीस यांनी मध्य प्रदेश राज्यातील सागर येथील डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ येथून अर्थशास्त्र विषयात ‘एमए’ केले. त्यानंतर त्यांनी ‘एकॉनोमेट्रिक्स ’या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. १९८१ साली विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्फत ‘जेआरएफ’साठी त्यांची निवड झाली होती. १९८८ मध्ये त्यांची महिला महाविद्यालय, नंदनवन येथे नियुक्ती झाली. मागील ३० वर्षांपासून त्या अध्यापनाचे कार्य करत आहेत.२००३ पासून त्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत.
अखेर मिळाली संधी
प्राचार्यपदाच्या कार्यकाळातदेखील त्यांच्या कामाचे बरेच कौतुक झाले व महिला महाविद्यालयात त्यांनी बरेच सकारात्मक बदल घडवून आणले. गेल्या अनेक वर्षांपासून विविध विद्यापीठांच्या कुलगुरूपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेण्यात येत होते. नागपूर विद्यापीठासाठीदेखील त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र प्रत्येक वेळी त्यांची संधी हुकत गेली. अखेर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.
अर्थशास्त्राच्या अभ्यासक म्हणून ओळख
डॉ.मृणालिनी फडणवीस यांचा अर्थशास्त्रावर सखोल अभ्यास असून देशविदेशात त्यांची ख्याती आहे. त्यांनी अर्थशास्त्रावर पुस्तकेदेखील लिहिली आहेत विशेष म्हणजे विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्यादेखील त्या तज्ज्ञ सदस्या होत्या. याशिवाय अर्थशास्त्राशी संबंधित विविध समित्यांवर काम करण्याचादेखील त्यांना अनुभव आहे. नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरदेखील त्यांनी काम केले आहे.
संघ परिवारात सक्रिय
डॉ.मृणालिनी फडणवीस या संघ परिवारात सक्रिय आहेत. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या संघ परिवारातील विविध संघटनांच्या कार्यक्रमांत त्यांचा नेहमीच सहभाग असतो. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.चांदेकर, ‘एसएनडीटी’च्या कुलगुरू डॉ.वंजारी हेदेखील संघ परिवारातीलच असून मुख्यालयाच्या शहरातूनच तीन लागोपाठ नियुक्त्या झाल्या आहेत, हे विशेष.