Scrub Typhus : पूर्व विदर्भात स्क्राय टायफसचा दुसरा बळी, ९ रुग्णांची नोंद

By सुमेध वाघमार | Published: September 2, 2022 06:28 PM2022-09-02T18:28:51+5:302022-09-02T18:35:24+5:30

आठवडाभरात दुसऱ्या मृत्यूने खळबळ

another scrub typhus death reported in vidarbha | Scrub Typhus : पूर्व विदर्भात स्क्राय टायफसचा दुसरा बळी, ९ रुग्णांची नोंद

Scrub Typhus : पूर्व विदर्भात स्क्राय टायफसचा दुसरा बळी, ९ रुग्णांची नोंद

Next

नागपूर : कोरोना व स्वाईन फ्लूची दहशत कमी होत नाही, तोच ‘स्क्रब टायफस’मुळे पूर्व विदर्भात आठवडाभरात आणखी एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. नागपूर मेडिकलमध्ये हा रुग्ण दाखल होता. याआधीचा रुग्ण दगावल्यानंतर २४ तासांतच तेथे आणखी एकाचा मृत्यू झाल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे.

नागपूर शहर व ग्रामीण मिळून या रोगाचा ९ रुग्णांची नोंद आहे. स्क्रब टायफसवर सध्या तरी प्रतिबंधक लस नाही, यामुळे आजार टाळण्यासाठी खबरदारी घेणे हाच एकमेव उपाय आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील ४९ वर्षीय पुरुष रुग्ण ३१ तारखेला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती झाला. प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, परंतु १ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी कळमेश्वर तालुक्यातील मोहपा गावातील ७२ वर्षीय एका पुरुष रुग्णाचा २५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांत उशिरा निदान व योग्य उपचार न मिळाल्याचे पुढे आले आहे. आठवड्याभरात दोन मृत्यूंनी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये या आजाराचे सर्वाधिक १५५ रुग्णांची नोंद व २९ बळी गेले होते.

-‘इशर’ या आजाराची ओळख 

‘चिगर माइट्स’मधील ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने ‘स्क्रब टायफस’ होतो. हे ‘माईट्स’ उंदराच्या शरीरावर चिकटून राहतात. पावसाळ्याच्या दिवसात उंदराच्या बिळात पाणी शिरले की, ते बिळाबाहेर येतात. त्यांच्या शरीरावरील ‘माईट्स’ हे उंच गवत, शेतात, झाडी-झुडपात पसरतात. या जीवाणूचा संपर्कात जी व्यक्ती येते, त्याच्या त्वचेवर चिकटून बसतात. त्यांच्यातील ‘ओरिएन्शिया सुसुगामुशी’ जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. चावलेल्या ठिकाणी व्रण येतो. ज्याला ‘इशर’ म्हणतात. हा ‘इशर’ या आजाराची ओळख आहे, परंतु सर्वांमध्ये ‘इशर’ दिसूनच येईल, असे नाही. 

- ही आहेत लक्षणे 

या आजाराची लक्षणे जवळपास डेंग्यूसारखीच असतात. सुरुवातीला ताप, कोरडा खोकला, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलट्या, चालताना तोल जाणे, लालसर पुरळ येणे आणि इतर तापाच्या रोगासारखी लक्षणे आढळतात, परंतु ४० टक्के लोकांमध्ये ही लक्षणे दिसतीलच असे नाही. यामुळे रुग्ण गंभीर होण्यापूर्वीच ही लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाला ‘डॉक्सिसायक्लीन’ किंवा ‘टिट्रासायक्लीन’ गोळ्या दिल्या जातात.

- लवकर निदान व उपचार आवश्यक

पाऊस परतीवर असल्याने ‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला आहे. मेडिकलमध्ये आतापर्यंत या आजाराच्या चार रुग्णांनी उपचार घेतले. त्यातील एका ४९ वर्षीय रुग्ण बुधवारी भरती झाला अणि गुरुवारी मृत्यू झाला. मेडिकलमध्ये येण्यापूर्वीच त्याची प्रकृती गंभीर होती. गुंतागुंत वाढल्याने त्याचा मृत्यू झाला. स्क्रब टायफसचे लवकर निदान व उपचार मिळाल्यास मृत्यूचा धोका कमी होतो.

- डॉ.प्रशांत पाटील, प्रमुख मेडिसिन विभाग मेडिकल

- उंच गवत, दाट झाडी-झुडुपात जाताना काळजी घ्या

आतापर्यंत नागपूर शहरात स्क्रब टायफसचे ५ रुग्ण आढळून आले. या आजाराला कारणीभूत ठरलेला ‘चिगर माईट्स’ जीवाणूचा प्रादुर्भाव हा उंच गवतावर, दाट झाडी-झुडुपात होतो. यामुळे तिथे जाणे टाळावे. उघड्यावर शौचास जाऊ नये, चारा, गवत गोळा करताना पूर्ण कपडे घालावे, झाडा-झुडुपात काम करून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवावे, आंघोळ करावी.

-डॉ.जास्मीन मुलाणी, हिवताप व हत्तीरोग विभाग मनपा.

Web Title: another scrub typhus death reported in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.