आणखी एक वाफेचे इंजिन नागपूरकरांसाठी उपलब्ध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:43+5:302021-01-25T04:09:43+5:30
नागपूर : पूर्वी वाफेच्या शक्तीवर धावणारे इंजिन रेल्वे रुळावर धावत होते. कालांतराने डिझेलचे इंजिन आल्यामुळे वाफेचे इंजिन रेल्वेतून हद्दपार ...
नागपूर : पूर्वी वाफेच्या शक्तीवर धावणारे इंजिन रेल्वे रुळावर धावत होते. कालांतराने डिझेलचे इंजिन आल्यामुळे वाफेचे इंजिन रेल्वेतून हद्दपार झाले. परंतु ऐतिहासिक वारसा म्हणून या इंजिनचे आजही रेल्वेने जतन केले आहे. यापैकी मोतीबाग रेल्वे संग्रहालयात आणि नागपूर रेल्वेस्थानकावर वाफेचे इंजिन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात भर घालत मोतीबाग वर्कशॉपमध्ये असलेले आणखी एक इंजिन नागपूरकरांना पाहता यावे यासाठी मोतीबाग वर्कशॉपच्या बाहेर लावण्यात येणार आहे. महिनाभरात हे इंजिन नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
मोतीबाग वर्कशॉपमध्ये असलेले वाफेचे इंजिन १९५४ मध्ये तयार झालेले आहे. हे इंजिन झेड ई क्लासचे असून काही दिवस हे इंजिन ओडिशा, अहमदाबाद, ग्वाल्हेर या नॅरोगेज मार्गावर धावले. त्यानंतर हे इंजिन नागपूर-छिंदवाडा, नैनपूर, जबलपूर, मंडला, बालाघाट या नॅरोगेज मार्गावर धावले. तर बंगाल-नागपूर रोड रेल्वेमार्गावर (बीएनआर) या इंजिनने प्रवाशांना सेवा दिली आहे. १९९२ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी वाफेचे इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे इंजिन बंद करण्यात आले. या ऐतिहासिक इंजिनचे जतन करण्यासाठी २००२ मध्ये हे वाफेचे इंजिन मोतीबाग वर्कशॉपमध्ये आणून त्याची स्थापना करण्यात आली. परंतु मोतीबाग वर्कशॉपमध्ये नागरिकांना प्रवेश नसल्यामुळे हे इंजिन पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी मोतीबाग वर्कशॉपच्या बाहेर मुख्य कारखाना व्यवस्थापक कार्यालयाच्या बाहेर तयार करण्यात येत असलेल्या चबुतऱ्यावर या इंजिनची स्थापना करण्यात येणार आहे. महिनाभरात हे इंजिन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. यामुळे नागपूरच्या नागरिकांना ऐतिहासिक वारसा असलेले वाफेचे इंजिन पाहता येणार आहे.
...........
मेट्रो रेल्वेतील प्रवाशांनाही दिसेल वाफेचे इंजिन
कामठी मार्गावर असलेल्या मोतीबाग वर्कशॉपच्या बाहेर वाफेचे इंजिन लावण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह मेट्रो रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हे ऐतिहासिक वाफेचे इंजिन पाहता येणार आहे.
.........