डेंग्यूने घेतला आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:50 AM2017-10-22T00:50:13+5:302017-10-22T00:50:13+5:30
तालुक्यातील पहाडी पारगाव येथे डेंग्यू सदृश आजारामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : तालुक्यातील पहाडी पारगाव येथे डेंग्यू सदृश आजारामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अनेक तापीचे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभाग गावात तळ ठोकून आहे. तारामती दगडू गोरे (४०) या महिलेचा बुधवारी, तर सत्यभामा माणिक साक्रूडकर (४२) यांचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला.
तारामती दगडू गोरे या महिलेला ताप वाढल्याने वडवणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आला होता. रक्त तपासणीत डेंग्यू आजार आढळल्याने औरंगाबाद येथे उपचार करण्यात आले होते. तेथून परत आणल्यानंतर अंबाजोगाई येथे स्वराती रुग्णालयात उपचार सुरू असतांना बुधवारी रात्री मृत्यू झाला होता. पहाडी पारगाव येथीलच सत्यभामा साक्रूडकर यांनाही ताप वाढला होता . त्यांनाही डेंग्युची लक्षणे दिसल्याने बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेताना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या ३६ तासात एकाच गावातील दोन महलांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.