संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

By admin | Published: October 24, 2015 03:11 AM2015-10-24T03:11:43+5:302015-10-24T03:11:43+5:30

बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या भूमीचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला,

The answer to each question in the Constitution | संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Next

दीक्षाभूमीचा विकास जागतिक दर्जानुसार : मुख्यमंत्री
नागपूर : बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या भूमीचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला, याचा मला अति आनंद होत असल्याची कृतज्ञता व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील स्मारक मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर भव्य स्वरूपात होईल. तसेच लंडनमधील ज्या घरात त्यांचे शिक्षणासाठी वास्तव्य होते. ते घर शासनाने विकत घेतले आहे. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने अर्थशास्त्र संशोधनाचा अभ्यासक्रम सुरु करू जेणेकरून लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमी येथे भारतातील विद्यार्थी शिक्षण घेतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिले. त्या संविधानात भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नमूद करून ठेवले आहे. गरिबातल्या गरीब माणसाला संविधानाने सन्मान दिला आहे. बाबासाहेबांनी ज्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो धर्म सर्व विश्वावर राज्य करीत आहे. आज चीन, जपान यासारखे प्रगत राष्ट्र गौतम बुद्धाच्या पंचशीलाच्या स्वीकार करून प्रगती करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राजकुमार बडोले यांनी बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीसाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दलित मागासवर्गीय समाजातील मुले नागरी सेवेत यावी यासाठी ५० मुलांना नवी दिल्लीच्या आयएएस कोचिंग वर्गात प्रवेश दिला आहे. त्यांचा सर्व खर्च शासन करेल, असेही
त्यांनी स्पष्ट केले. महापौर प्रवीण दटके यांनी आपल्या भाषणात दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेत हा आराखडा २०० कोटी रुपयांचा वर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी लाखो अनुयायांना रक्ताचा एक थेंबही न सांडता बुद्ध धर्माची दीक्षा दिली. जगात असे एकही उदाहरण नाही. भारताची एकात्मता अबाधित राखण्यासाठी बाबासाहेबांनी जे प्रयत्न केले, त्याला तोड नाही. जगातील अनेक देशांमध्ये जीवघेणा संघर्ष सुरू आहे. परंतु भारतात विविध जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. हे सर्व बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानामुळे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. गोरगरिबांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व्यसनमुक्त धोरण शासनाने प्रभावीपणे राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी आपल्या प्रास्ताविकेत दीक्षाभूमीच्या विकासासाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न उपस्थित केला तसेच आरोग्य विभागाची किंवा दीक्षाभूमी परिसरातील मोकळी जागा स्मारक समितीला देण्याची विनंती केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मारक समितीचे माजी अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली वाहण्यात आली. भुवनेश्वरी मेहरे व अर्चना मेश्राम यांनी संचालन केले. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी आभार मानले.
याप्रसंगी न्यायमूर्ती भूषण गवई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पुरण मेश्राम, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, स्मारक समितीचे सदस्य अ‍ॅड. मा.म. येवले, विजय चिकाटे, पुरुषोत्तम भागवत, अ‍ॅड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, प्रो. डी.जी. दाभाडे आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)
८०० किमीचे बुद्ध सर्किट- गडकरी
तथागत गौतम बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेले. ती स्थळे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. परंतु रस्त्यांच्या सुविधांअभावी पर्यटकांना मोठी अडचण होते. त्यामुळे लुंबिनी (नेपाळ) ते सारनाथ या बुद्ध सर्किट असलेल्या ८०० किलोमीटरचा रस्ता सिमेंटीकरण करून जगभरातील पर्यटकांसाठी खुला करून देण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. चार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार असून येत्या दोन महिन्याच्या आत कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The answer to each question in the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.