अपमानाला कर्तृत्वाने दिले उत्तर
By admin | Published: June 19, 2015 02:27 AM2015-06-19T02:27:22+5:302015-06-19T02:27:22+5:30
सातवीत शिकणाऱ्या नीतेशच्या मित्राला एकदा शाळेचा पुरस्कार मिळाला. मित्राच्या दिवाणखाण्यात चकाकणाऱ्या त्या पुरस्काराला स्पर्श करण्याचा मोह अबोध नीतेशला आवरला नाही.
नागपूर : सातवीत शिकणाऱ्या नीतेशच्या मित्राला एकदा शाळेचा पुरस्कार मिळाला. मित्राच्या दिवाणखाण्यात चकाकणाऱ्या त्या पुरस्काराला स्पर्श करण्याचा मोह अबोध नीतेशला आवरला नाही. त्याने त्या पुरस्काराच्या दिशेने हात पुढे केला अन् तेवढ्यात त्या मित्राची आई कडाडली...‘‘थांब हा माझ्या मुलाचा पुरस्कार आहे आणि त्याला स्पर्श करण्याची तुझी लायकी नाही’’ हे बोचरे शब्द नीतेशला घायाळ करून गेले. त्याचवेळी त्याने असे अनेक पुरस्कार पायाशी लोळण घालतील असे कर्तृत्व करून दाखवण्याचा संकल्प केला व घरच्या गरिबीचा बाऊ न करता स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. त्याचे हे परिश्रम अखेर कामी आले. काल-परवाच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याने ९४.४० टक्के गुण मिळवले. नीतेशने त्याच्या अपमानाला कर्तृत्वाने उत्तर दिले असून आज अनेक पुरस्कार खरंच त्याच्या ओंजळीत सामावले आहेत. नीतेश चंद्रशेखर पुडके असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव. नंदनवनातील ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात तो शिकतो. हसनबाग चौकात त्याचे किरायाचे घर आहे. वडील हातमजुरी करतात. आई केकच्या कंपनीत कामाला जाते. कुठल्याही गरीब कुटुंबात असतात त्या सर्वच समस्या नीतेशच्या घरातही आहेत. परंतु या समस्यांवर मात करून पुढे जाण्यासाठी त्याने पेपर वाटण्याचा निर्णय घेतला. पहाटे ५ ला उठून तो ९० घरी पेपर वाटायचा. तिकडून परतल्यावर शाळा. शाळेतून परतल्यावर घरकाम आणि त्यातून वेळ काढून अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता.
नीतेशची संघर्षगाथा : प्रतिकूलतेचा चक्रव्यूह भेदूून दहावीत मिळवले यश
सायकल हवी, पण बोलू कसे?
साधे ६० टक्के गुण मिळवले तरी पालक आपल्या मुलांना डोक्यावर घेतात. त्यांनी मागितल्या नसतानाही अनेक सुविधा त्यांच्या पुढ्यात ठेवल्या जातात. परंतु घरच्या गरिबीमुळे नीतेशकडे ती सोयही नाही. त्याला आता कॉलेजला जायला सायकल हवी आहे परंतु रोजच्या जेवणासाठी वडील करीत असलेला संघर्ष त्याच्यापासून लपून राहिलेला नाही. अशा स्थितीत सायकलबाबत वडिलांना कसे बोलावे, असा प्रश्न त्याला पडला आहे.