भंडाऱ्यात पोत्यांमध्ये मिळत आहेत उत्तरपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:06+5:302021-02-24T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका भंडारा जिल्ह्यात चक्क पोत्यांमध्ये भरलेल्या स्थितीत सापडल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका भंडारा जिल्ह्यात चक्क पोत्यांमध्ये भरलेल्या स्थितीत सापडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक उत्तरपत्रिका कोऱ्या असून त्याचा दुरुपयोग होण्याचा धोका आहे. परंतु याला नागपूर विद्यापीठाने गंभीरतेने घेतलेले नाही व ती रद्दी असल्याचा दावा केला आहे.
भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पोत्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत उत्तरपत्रिका सापडल्या. यातील काही उत्तरपत्रिका जुन्या आहेत. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता ट्रकचा अपघात झाल्याने उत्तरपत्रिका पडल्या असल्याचा त्यांनी दावा केला. मात्र उत्तरपत्रिका जुन्या असो किंवा नवीन त्यात विद्यार्थ्यांची मूल्यांकनाकर्त्यांची माहिती असते. त्यामुळे ही बाब गोपनीय असते. याची संपूर्ण जबाबदारी परीक्षा विभागावर असते. एका वर्षानंतर उत्तरपत्रिकांची विल्हेवाट लावण्याचा विद्यापीठाला अधिकार आहे. मात्र त्यासाठी नियम ठरविण्यात आले आहेत. या प्रक्रियेत प्रचंड सावधपणा बाळगणे आवश्यक असते. मात्र असे झाले नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाने उत्तरपत्रिकांची निविदा जारी करुन व उत्तरपत्रिका संबंधित व्यक्तीला देऊन त्याला रद्दी मानले. मात्र कायद्यानुसार त्यांची विल्हेवाट लावली की नाही याची चाचपणी केलीच नाही.
भंडारा जिल्ह्यातील अनेक भागांत किराणी दुकान, हातठेले, भाजीविक्रेते यांच्याकडे उत्तरपत्रिका सापडत आहेत. त्यांचा उपयोग खाद्य सामान तसेच भाजी बांधण्यासाठी करण्यात येत आहे. याअगोदर १२ फेब्रुवारी रोजी काही उत्तरपत्रिका भंडारा जिल्ह्यातच सापडल्या होत्या. या सर्व उत्तरपत्रिका जुन्या असून त्यांना निविदा जारी करुन रद्दीत विकल्याचे परीक्षा विभागाने तेव्हा स्पष्ट केले होते. संबंधित व्यक्ती उत्तरपत्रिका ट्रकमध्ये भरून तुमसरमार्गे रायपूरला घेऊन जात होता. यातून काही पोते खाली पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस तक्रार नोंदविण्याचे निर्देश
या प्रकरणाची माहिती मिळताच उत्तरपत्रिकांचे कंत्राट मिळालेल्या कंपनीच्या मालकाला डॉ.साबळे यांनी भंडारा येथे जाण्यास सांगितले. उत्तरपत्रिकांना ताब्यात घेऊन पोलीस तक्रारदेखील नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत.
रस्त्यावर कशा आल्या उत्तरपत्रिका ?
इतक्या मोठ्या प्रमाणात उत्तरपत्रिका रस्त्यावर कशा पडल्या याचे ठोस उत्तर मिळू शकलेले नाही. पहिल्यांदा असे प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीला नोटीस बजावून उत्तर मागविले होते. उत्तरपत्रिका घेऊन जाणाºया ट्रकचा अपघात झाल्याने काही पोती खाली पडली असे उत्तर त्यात देण्यात आले होते. मात्र खरोखर असे झाले होते का याची शहानिशा करण्यात आलेली नाही.