अंत्ययात्रा पोलीस ठाण्यावर
By admin | Published: March 5, 2016 03:05 AM2016-03-05T03:05:21+5:302016-03-05T03:05:21+5:30
आकाश प्रल्हाद शेंडे (वय २०) या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करणारांना अटक करा, ही मागणी करीत शोकसंतप्त नातेवाईकांनी अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला.
आकाश शेंडे अपहरण आणि हत्या : प्रतापनगरात प्रचंड तणाव
नागपूर : आकाश प्रल्हाद शेंडे (वय २०) या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करणारांना अटक करा, ही मागणी करीत शोकसंतप्त नातेवाईकांनी अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही वेळेसाठी प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
सुभाषनगरात सायकल स्टोर्स चालवणाऱ्या आकाशचा काही तरुणांसोबत उधारीच्या पैशातून वाद सुरू होता. त्यामुळे ४ फेब्रुवारीला आरोपींनी त्याला दुकानात येऊन मारहाण केली होती. यावेळी कुटुंबीयांनी आरोपींची समजूत काढून १ मार्चला पैसे देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, तत्पूर्वीच २९ फेब्रुवारीला दुपारी शेंदरे, ढवळे आणि आणखी पाच-सात आरोपी आकाशच्या दुकानात आले आणि पैशाची मागणी करू लागले. पैसे काही दिवसात देतो, असे सांगणाऱ्या आकाशला आरोपींनी दुकानातून उचलून नेले. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याच्या अपहरणाची तक्रार घेऊन गेलेल्या कुटुंबीयांना प्रतापनगर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. गुरुवारी प्रतापनगर पोलिसांना अंबाझरी तलावात आकाश शेंडेचा मृतदेह सापडला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मेडिकलमध्ये बोलावून पोलिसांनी शेंडे कुुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले. मात्र, आकाशचे अपहरण करून त्याची हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी संतप्त शेंडे कुटुंबीयांनी केली अन् आरोपींना अटक केल्याशिवाय आकाश शेंडेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे सांगितले. त्यावेळी शेंडे कुटुंबीयांची पोलिसांनी कशीबशी समजूत घातली. मात्र, पोलिसांवरच प्रकरण दडपण्याचा संशय घेऊन शोकसंतप्त शेंडे कुटुंबीय नातेवाईक, मित्र तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी आकाश शेंडेची अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण प्रचंड तणावग्रस्त झाले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन पोलिसांनी समजूत काढली.(प्रतिनिधी)