आरक्षण कार्यालयात असामाजिक तत्त्वांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:44+5:302021-06-21T04:07:44+5:30
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयाकडे दुर्लक्ष असल्यामुळे येथे असामाजिक तत्त्व सक्रिय झाले आहेत. येथे प्रवाशांची लूट होत ...
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील आरक्षण कार्यालयाकडे दुर्लक्ष असल्यामुळे येथे असामाजिक तत्त्व सक्रिय झाले आहेत. येथे प्रवाशांची लूट होत आहे. या कार्यालयात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस ड्युटी बजावत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांचे चांगलेच फावत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात आरक्षण कार्यालय आहे. येथे दिवसाकाठी हजारावर प्रवासी तिकीट खरेदी करण्यासाठी येतात. परंतु येथे रेल्वे सुरक्षा दल किंवा लोहमार्ग पोलीस कर्तव्य बजावताना दिसून येत नाहीत. या बाबीचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्व या कार्यालयात सक्रिय झाले आहेत. पूर्वी या कार्यालयात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि लोहमार्ग पोलीस तैनात करण्यात येत होते. त्यावेळी नियमित येथे पाकिटमार, मोबाईल चोरांवर कारवाई व्हायची. परंतु आता येथे एकही सुरक्षा कर्मचारी दिसत नाही. सध्या कोरोनामुळे केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. याचा फायदा घेऊन हे असामाजिक तत्त्व प्रवाशांची लूूट करतात. तुम्हाला कन्फर्म तिकीट काढून देतो अशी बतावणी करून ते प्रवाशाकडून पैसे आणि आरक्षण फॉर्ममध्ये लागणारी माहिती घेतात. एका ठिकाणी प्रवाशाला बसवून ते तिकीट काढण्याच्या बहाण्याने निघून जातात. परंतु ते परत येत नाहीत. खूप वेळ झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती परत न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब प्रवाशांच्या लक्षात येते. मागील काही दिवसात अनेकदा असे प्रकार घडल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांची लूट टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांची येथे गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
............