२ ते ६ वयोगटातील मुलांमध्येही आढळून आल्या अँटिबॉडीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:39+5:302021-07-04T04:06:39+5:30
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत लहान मुलांची वाढलेली संख्या व संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याने त्यांचे लसीकरण ...
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेत लहान मुलांची वाढलेली संख्या व संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याने त्यांचे लसीकरण कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना शनिवारी २ ते ६ या वयोगटात झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीत तीन मुलांमध्ये प्रतिपिंडाची (अँटिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, २ ते १८ वयोगटातील या मानवी चाचणीतून १८ टक्के मुलांमध्ये अँटिबॉडी वाढल्याचे म्हणजेच त्यांच्या नकळत कोरोना होऊन गेल्याचे समोर आले. यावरून मोठ्या प्रमाणात मुले कोरोना विषाणूच्या सान्निध्यात आली असावी, असा अंदाज आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या ‘व्हेरिएन्ट’मुळे चिंता वाढली आहे. यात लहान मुलांमध्ये वाढलेल्या अँटिबॉडीजमुळे दिलासा मिळाला आहे. परंतु काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत. राज्यात पहिल्यांदाच नागपुरात लहान मुलांवरील भारत बायोटेक कंपनीचा ‘कोव्हॅक्सिन’ चाचणीला ६ जूनपासून सुरुवात झाली. बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या नेतृत्वात २ ते १८ वयोगटात तीन टप्प्यात ही चाचणी झाली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणीसाठी ५० मुलांची निवड करण्यात आली. यातील १० मुलांमध्ये अँटिबॉडीज वाढल्याचे दिसून आले. चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात ७ ते ११ वयोगटासाठी निवड झालेल्या ३० मुलांपैकी पाच मुलांमध्ये अँटिबॉडीज वाढल्या होत्या. तर, शनिवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ या वयोगटासाठी निवड झालेल्या २० मुलांपैकी तीन मुलांना ताप तर तीन मुलांमध्ये अँटिबॉडीज वाढल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. एकूणच १०० मुलांमधून १८ मुलांमध्ये प्रतिपिंडाची वाढ झाल्याचे आढळून आले.
- घरातीलच व्यक्तीकडून संसर्गाची शक्यता अधिक
डॉ. खळतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ज्या कुटुंबात कोरोनाचे रुग्ण नव्हते त्याच कुटुंबातील मुलांची कोरोना लसीच्या मानवी चाचणीसाठी निवड करण्यात आली. मात्र, त्यानंतरही १०० मधून १८ टक्के मुलांमध्ये अँटिबाडीज आढळून आल्या. विशेष म्हणजे, २ ते ६ वयोगटातील मुले स्वत:हून घराबाहेर पडत नाही. त्यांच्यामध्येही प्रतिपिंडाची निर्मिती झाल्याचे दिसून आले. यावरून कुटुंबातील कुणाला लक्षणे नसताना ती पॉझिटिव्ह आली असावीत व त्यांच्याकडून त्यांच्या मुलांमध्ये संक्रमण झाले असावे, असा अंदाज आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी हे कारण धोकादायक ठरू शकते.
::२ ते ६ वयोगटात २० मधून तीन मुलांमध्ये वाढल्या अँटिबॉडीज
:: ७ ते ११ वयोगटात ३० मधून पाच मुलांमध्ये वाढल्या अँटिबॉडीज
:: १२ ते १८ वयोगटात ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अँटिबॉडीज
.............................................................
:: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १९ वर्षांखालील ३०,४२० बाधित
:: कोरोनाचा दुसऱ्या लाटेत १९ वर्षांखालील ३७ मृत्यू
.................................................................................