अचानक आपली बस थांबवून अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:40+5:302021-06-22T04:07:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काटोल मार्गावर सोमवारी अचानक आपली बस थांबवून बसमधील प्रवाशांची अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल मार्गावर सोमवारी अचानक आपली बस थांबवून बसमधील प्रवाशांची अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आली. जवळपास दोन तास या मार्गावरील बसमधील प्रवाशांची चाचणी करण्यात आली. वास्तविक शहरात कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असताना मोजक्याच प्रवाशांची चाचणी केली जात होती. परंतु आता नागपूर शहरातील संक्रमण दर १ टक्क्याच्या खाली गेला आहे. राज्य सरकारने दुसऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना कोविड चाचणी रिपोर्टची सक्ती उठविली आहे.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता मनपाचा आरोग्य विभाग व पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेतून अँटिजन चाचणी केली जात आहे, परंतु मनपातर्फे प्रवासी बसून प्रवास करण्याचा नियम पाळतात की नाही याची शहानिशा कोण करणार ? प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नसेल तर बसची संख्या वाढविण्याची गरज आहे. परंतु मनपाला नागरिकांच्या सुविधेपेक्षा आपल्या तिजोरीची अधिक चिंता आहे.
म्हणूनच बस फेऱ्या वाढविल्या जात नाहीत. सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतरही फक्त ५० टक्के क्षमतेने अर्थात २०० बस धावत आहेत. वास्तविक मार्च-एप्रिल २०२० च्या स्तरावर आले आहे. परंतु बस सुरू करण्याबाबत चालढकल केली जात आहे.
आयबीटीएम ऑपरेटर डिम्टसचे अधिकारी अंबाडीकर म्हणाले, कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान काटोल मार्गावर धावणाऱ्या बसमधील प्रवाशांची अँटिजन टेस्ट केली जात होती. परंतु सध्या ती बंद करण्यात आली होती. परंतु सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे बस सेवा प्रभावित झाली नाही. परिवहन विभागाने चाचणी संदर्भात सांगितले नव्हते. बसमधील प्रवासी नियमांचे पालन करीत आहे. किती प्रवाशांची टेस्ट करण्यात आली याची माहिती मिळाली नाही.