पूर्व नागपुरात दिव्यांगांसाठी उभारणार ‘अनुभूती पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 06:55 PM2022-08-19T18:55:09+5:302022-08-19T18:56:25+5:30
Nagpur News नागपूर शहरातील दिव्यांगांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूर सुधार प्रन्यास पूर्व नागपुरात ‘अनुभूती पार्क ’ उभारणार आहे.
नागपूर : नागपूर शहरातील दिव्यांगांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नागपूर सुधार प्रन्यास पूर्व नागपुरात ‘अनुभूती पार्क ’ उभारणार आहे. याबाबतचा प्रोजेक्ट रिपार्ट तयार करण्यात आला आहे. आगळ्यावेगळ्या या ११.७० कोटींच्या या प्रकल्पाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
६६०० चौरस मीटर जागेत बांधकाम केले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळामुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ज्यामध्ये शाळा, शैक्षणिक साधने, ऑडिटोरियम, सभागृह, रस्ते, उद्यान, खेळणी, मनोरंजन क्षेत्रे, आरोग्य केंद्रे, रॅम्प, व्हीलचेअर, टायलेट यासह आवश्यक सुविधा उपलब्ध राहतील. नागपुरात अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रकल्प राहणार आहे. यामुळे दिव्यांगांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. सिपडा योजनेंतर्गत हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
व्यायामासाठी अत्याधुनिक साधने
दिवयांगांना व्यायाम करण्यासाठी उद्यानात विविध प्रकारची साधने उपलब्ध केली जाणार आहे. व्हीलचेअरवर बसून त्यांना खेळ व व्यायामाचे प्रकार करता येतील. यात लहान मुलांच्या साधनांचाही समावेश राहणार आहे. तसेच हसत खेळत शिकता यावे, यासाठी साधने राहतील.
परिसरात आवश्यक सुविधा
अनुभूती पार्कचे निर्माण करताना या परिसरात पावसाळी नाल्या, जलवाहिन्या, रस्ते, ग्टार लाईन, पथदिवे अशा मूलभूत सुविधा निर्माण केल्या जातील. याचा प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पूर्व नागपूरच्या विकासात भर पडणार आहे.
दिव्यांगांना लाभ होईल
नागपूर सुधार प्रन्यास पूर्व नागपुरात ‘अनुभूती पार्क ’ उभारत आहे. या ठिकाणी शाळा, उद्यान, खेळाची साधने यासह विविध बाबींचा समावेश आहे. ११.७० कोटींच्या या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. नागपूर शहरात दिव्यांगांसाठी अशा स्वरूपाचा पहिलाच प्रकल्प आहे. याचा दिव्यांगांना लाभ होणार आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, सभापती नासुप्र