अनुष्काला मृत्यूच्या जबड्यातून ओढायचे आहे...!
By admin | Published: January 30, 2015 12:52 AM2015-01-30T00:52:38+5:302015-01-30T00:52:38+5:30
पावसाळयातील झड असो की गोठवून टाकणारा हिवाळा, गोरखा बहादुर ऊर्फ जगतसिंग रात्रभर परिसरात फिरतो. शिटी वाजवत ‘आॅल इज वेल’चे संकेत देतो. चोर, भामट्यांनी वस्तीत शिरू नये,
दानदात्यांनी पुढे येण्याची गरज
नागपूर : पावसाळयातील झड असो की गोठवून टाकणारा हिवाळा, गोरखा बहादुर ऊर्फ जगतसिंग रात्रभर परिसरात फिरतो. शिटी वाजवत ‘आॅल इज वेल’चे संकेत देतो. चोर, भामट्यांनी वस्तीत शिरू नये, म्हणून डोळ्यात तेल घालून तो जागली करतो. अनेकदा त्याची चोर, भामट्यासोबत गाठ पडते. न घाबरता तो त्यांना पळवून लावत आपले नाव सार्थ करतो. मात्र बहादूर गोरखाचा जीव आता डोळ्यात आला आहे. कारण, त्याच्या लाडक्या नऊ वर्षीय लेकीला रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) आहे. जगतसिंगच नव्हे तर त्याचा पूर्ण परिवारच त्यामुळे खचला आहे. त्याच्या अनुष्का (वय ९ वर्षे) नामक चिमुकलीला दानदात्यांच्या मदतीची तातडीने गरज आहे.
चुणचुणीत अनुष्का आपल्या आजोळी धनसिंगपूर (काठमांडू, नेपाळ) तिसऱ्या वर्गात शिकायची. वारंवार आजारी पडत असल्यामुळे गेल्यावर्षी गावाकडे (धनसिंगपूर) गेलेल्या बहादूरने अनुष्काला नागपुरात आणले. तिच्यावर मेयोत उपचार सुरू झाले. २२ नोव्हेंबर २०१४ ला अनुष्काला रक्ताचा कर्करोग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बहादूर ते ऐकून हादरला. त्याने आजूबाजूच्यांना माहिती दिली. काही सद्गृहस्थांनी मदत केली. धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात अनुष्काच्या तपासण्या झाल्या.
नंतर तिला मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मुंबईत राहाण्या खाण्याचाही खर्च बहादूरच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे अनुष्काला धरमपेठेतील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये परत आणण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू आहे. अनुष्काच्या उपचारासाठी साडेतीन लाखांची तातडीने गरज आहे. वर्धमान नगरातील जयभवानी हाऊसिंग सोसायटीत चौकीदाराच्या एका लहानशा खोलीत राहाणाऱ्या बहादूरला निशा (वय ७), अखिल (वय ५) आणि रेहान (वय ७ महिने) ही मुले आहेत. त्याला चौकीदारीपोटी महिन्याला पाच हजार रुपये मिळतात. अखिल ‘स्पेशल चाईल्ड‘ असल्यामुळे एक ते दीड हजार त्याच्या उपचारावर खर्च होतात. उर्वरित रक्कमेतून बहादूर आपल्या परिवाराचे कसेबसे भरणपोषण करतो. अनुष्काच्या उपचारासाठी त्याने आतापावेतो पत्नीच्या अंगावर असलेले संपूर्ण दागिने विकले आहे. साडेतीन लाखांची रक्कम त्याच्यासाठी खूप मोठी आहे.
ती कशी जमवावी, असा प्रश्न त्याच्यासकट त्याच्या पत्नीलाही पडला आहे. अनुष्काभोवती मृत्यु पाश आवळत आहे. तिला त्यातून बाहेर काढायचे आहे. त्यासाठी दानदात्यांची गरज आहे. दानदात्यांच्या पुढाकारामुळेच चुणचुणीत अनुष्का मृत्यूच्या जबड्यातून बाहेर येऊ शकते. (प्रतिनिधी)
मदतीसाठी संपर्क
बहादूर ऊर्फ जगतसिंग पदम्सिंग जयभवानी हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर. मोबाईल : ८४२१५६००८४, स्टेट बँक आॅफ इंडिया, ३२१४८०९९३७८, आयएफएससी कोड एसबीआयएन ०००५४६१.
१५ दिवसानंतर पुढच्या उपचाराचा निर्णय
अनुष्काला ब्लड कॅन्सर आहे. १५ दिवसांपासून अनुष्कावर मी आणि डॉ. प्रकाश कांकाणी उपचार करीत आहोत. आणखी १५ दिवसानंतर पुढच्या उपचाराचा निर्णय घेऊ. अनुष्कासाठी बाहेरची औषधे आणि अन्य खर्चासाठी तिच्या पालकांना किमान अडीच ते तीन लाख रुपयांची गरज भासणार आहे.
डॉ. आनंद पाठक
कर्करोग तज्ज्ञ, नागपूर