कोरोनाच्या दुहेरी आकड्याने वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:45+5:302021-09-15T04:12:45+5:30
नागपूर : कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्यांचा अहवाल मनपाला प्राप्त झाला नसला तरी मागील २४ तासांत १२ नवे रुग्ण आढळून ...
नागपूर : कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्यांचा अहवाल मनपाला प्राप्त झाला नसला तरी मागील २४ तासांत १२ नवे रुग्ण आढळून आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा दुहेरी आकड्याने चिंता वाढली आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,९३,१४६ तर मृतांची संख्या १०,११९ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ३५०८ चाचण्या झाल्या. यात शहरात २९८६ चाचण्यांमधून ८, ग्रामीणमध्ये ५२२ चाचण्यांमधून २ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर २ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत. पॉझिटिव्हीटीचा दर ०.३ टक्के आहे. रविवारी १२ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३०० लोकांची तपासणी करण्यात आली. परंतु यातील किती रुग्ण पॉझिटिव्ह आले याची माहिती पुढे आलेली नाही. आज ९ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८२,९४८ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.९३ टक्के आहे.
- सक्रिय रुग्णांत वाढ
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ५०च्या आत होती. परंतु ५ सप्टेंबरपासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ही संख्या ७९वर पोहचली आहे. यातील ५७ रुग्ण शहरातील, २० रुग्ण ग्रामीण भागातील तर २ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत. सध्या ७९ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ३५०८
शहर : ८ रु ग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,१४६
ए. सक्रिय रुग्ण :७९
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,९४८
ए. मृत्यू : १०११९