आपली बस सुरू होणार : परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 09:14 PM2020-09-29T21:14:00+5:302020-09-29T21:15:12+5:30
कोविडच्या प्रादुभार्वामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली 'आपली बस’ शहर बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मगळवारी मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडच्या प्रादुभार्वामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली 'आपली बस’ शहर बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मगळवारी मंजुरी देण्यात आली.
मनपा मुख्यालयात परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली. परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिंपरुडे, विनय भारद्वाज यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिवहन समिती सदस्य नितीन साठवणे, रूपा राय, वैशाली रोहनकर, रूपाली ठाकूर, राजेश घोडपागे उपस्थित होते.
कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्य शासनातर्फे अनलॉक सुरू करण्यात आले असून त्या अंतर्गत राज्य परिवहन बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आपली बस सेवा सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली.
शहरातील सर्वच आस्थापना, व्यवसाय, उद्योग, कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपली बस बंद असल्याने कामगारांचे हाल होत आहेत. प्रवासासाठी जादा भाडेही द्यावे लागत असल्याचे निदर्शनास आणले.
बससेवा सुरू करणे गरजेचे
शहरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आपली बस ५० टक्के प्रवासी वाहतुकीसह बस सुरू करण्याचे प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती बाल्या बोरकर यांनी दिली. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल
अनलॉकसंदर्भात शासनाचे दिशानिर्देश व मुंबई, पुणे शहरात शहर बस सेवेच्या धर्तीवर नागपूर शहरातही बससेवा सुरू करण्यासंदर्भात मनपा प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.