ॲप बेस्ड टॅक्सी चालकांचा चक्का जामचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:47+5:302021-03-09T04:08:47+5:30
नागपूर : ओला व उबर या कंपन्यांच्या गाड्या चालविणारे टॅक्सी ड्रायव्हरला कोरोना कालावधीमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत ...
नागपूर : ओला व उबर या कंपन्यांच्या गाड्या चालविणारे टॅक्सी ड्रायव्हरला कोरोना कालावधीमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बँकांचे हप्ते भरणे कठीण होऊन गेले आहे. ओला आणि उबर कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात छळ होत आहे. टॅक्सी ड्रायव्हरला त्वरित न्याय मिळवून द्यावा अन्यथा चक्का जाम केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनने एएनआय टेक्नॉलॉजिस्ट प्रा.लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना लिहिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
टॅक्सी चालकांना ओला व उबर कंपन्यांनी भागीदार बनवून नंतर मनमानी दर आकारून त्यांची फसवणूक केली आहे. करारनाम्यातील अटी व शर्तींचा दाखला देऊन या कंपन्या टॅक्सी चालकांचे शोषण करीत आहेत. टॅक्सी चालकांनी जमा केलेल्या सुरक्षा राशीत व्याज देण्यास या कंपन्या नकार देत असून चालकांची लूट चालविली आहे.
कंपन्यांनी पूर्वी लागू केलेले बेस्ड रेट परत लागू करावे, ॲडव्हान्स बुकिंगचा पूर्ण हिस्सा टॅक्सी चालकांना द्यावा, इत्यादी मागण्या युनियनने केल्या आहेत. सात दिवसाच्या आत आमच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा १५ मार्चपासून चक्का जाम आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा युनियनचे पदाधिकारी दीपक साने, अनिल शाहू, मोनू गरेवाल, सागर इंगलकर, अजय बागडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.