अॅप डाऊनलोड केले, ९९ हजार गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 12:08 PM2021-08-05T12:08:19+5:302021-08-05T12:09:22+5:30
Nagpur News अॅप डाऊनलोड करायला सांगून आरोपीने पाचवेळा पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानंतर एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ९९ हजार ९४० रुपये काढून घेतल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅप डाऊनलोड करायला सांगून आरोपीने पाचवेळा पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानंतर एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ९९ हजार ९४० रुपये काढून घेतल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.
रवी श्रीलल्लन शर्मा (२७) रा. चिंचभुवन वर्धा रोड यांनी आपल्या आईच्या उपचारासाठी १० हजार रुपये गुगल पे अकाऊंटद्वारे ऑनलाईन पाठविले होते; परंतु रक्कम न पोहोचल्यामुळे त्यांनी गुगल पे कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर संपर्क साधला. दरम्यान, आरोपीने शर्मा यांना अॅप डाऊनलोड करायला लावले. त्यानंतर दिलेला पासवर्ड आरोपीने पाचवेळा टाकायला लावला. पासवर्ड टाकल्यानंतर शर्मा यांच्या एचडीएफसी बँक अकाऊंटमधून पाचवेळा ट्रान्झक्शन होऊन एकूण ९९ हजार ९४० रुपयांची रक्कम आरोपीने वळती केली. शर्मा यांनी बँकेत व सायबर सेलमध्ये तक्रार दिल्यानंतर त्यांची रक्कम आरोपी रा. रतन रा. ई. डब्ल्यू. एस. २५, सेक्टर एम. एस. बी. आय. कॉलनी, पोस्ट अलिगड, उत्तरप्रदेश याच्या खात्यावर जमा झाल्याचे समजले. या प्रकरणी शर्मा यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४१९, ४२०, सहकलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
..........