जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:08 AM2021-09-24T04:08:24+5:302021-09-24T04:08:24+5:30
नागपूर : पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या व त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीचा मृतदेह जाळणाऱ्या क्रूरकर्मा पतीची जन्मठेपेची शिक्षा ...
नागपूर : पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या व त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीचा मृतदेह जाळणाऱ्या क्रूरकर्मा पतीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली, तसेच या शिक्षेविरुद्ध पतीने दाखल केलेले अपील फेटाळून लावले. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे.
अंकुश धर्मा चव्हाण (३७) असे आराेपीचे नाव असून तो पिंपळगाव (इजारा), ता. पुसद येथील रहिवासी आहे. त्याला न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्या न्यायपीठाने दणका दिला. मयताचे नाव लक्ष्मीबाई होते. तिचे घटनेच्या १५ वर्षापूर्वी आरोपीसोबत लग्न झाले होते. दरम्यान, त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. आरोपी मजुरी करीत होता व तो लक्ष्मीबाईला हुंड्यासाठी सतत छळत होता. परिणामी, त्यांचे भांडण होत होते. त्यातून आरोपीने १२ नोव्हेंबर २०१४ रोजी लक्ष्मीबाईचा खून केला. ३० जानेवारी २०१८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. घटनेच्या दिवशी घरी उपस्थित नव्हतो, असा बचावाचा मुद्दा आरोपीने मांडला होता. परंतु, मुलाच्या जबाबामुळे त्याचा हा दावा खोटा ठरला.