खाणींमधील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन; ‘मायनिंग इंडस्ट्री व्हिजन २०३० अॅण्ड बियॉन्ड’ चा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 08:49 PM2017-12-08T20:49:22+5:302017-12-08T20:50:12+5:30
खाण क्षेत्रावर असलेला प्रदूषणाचा ठपका पुसून काढण्यासाठी खाणींमध्ये उत्खनन आणि खनिजांचे दळणवळण करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खाण व त्या परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन नीरीचे माजी संचालक आणि रिक्रूटमेंट अॅण्ड अॅसेसमेंट बोर्ड, सीएसआयआरचे चेअरमन डॉ. एस.आर. वटे यांनी येथे केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : खाण क्षेत्रावर असलेला प्रदूषणाचा ठपका पुसून काढण्यासाठी खाणींमध्ये उत्खनन आणि खनिजांचे दळणवळण करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खाण व त्या परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन नीरीचे माजी संचालक आणि रिक्रूटमेंट अॅण्ड अॅसेसमेंट बोर्ड, सीएसआयआरचे चेअरमन डॉ. एस.आर. वटे यांनी येथे केले.
मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एमईएआय) नागपूर चॅप्टरच्या वतीने ‘मायनिंग इंडस्ट्री व्हिजन २०३० अॅण्ड बियॉन्ड’ या विषयावर तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचा समारोप शुक्रवार, ८ डिसेंबरला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये झाला. समारोपीय समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिओलॉजी अॅण्ड मायनिंग संचालनालय, महाराष्ट्रचे संचालक आर.एस. कळमकर, आयबीएमचे कन्ट्रोलर जनरल व एमईएआयचे मुख्य संरक्षक रंजन सहाय, परिषदेच्या समितीचे चेअरमन प्रा. बी.बी. धर, मायनिंग इंजिनिअर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एमईएआय) नागपूर चॅप्टरचे चेअरमन डी.के. सहानी, एमईएआय नागपूर चॅप्टरचे उपाध्यक्ष एच.आर. कालीहारी आणि माजी अध्यक्ष एस.एम. बोथरा उपस्थित होते.
वटे म्हणाले, शाश्वत खनन हे खाणीची अर्थव्यवस्था, पर्यावरण व सामजिक दृष्टिकोन आणि योग्य संचालन या तीन बाबींवर अवलंबून आहे. रिमोट सेन्सिंग, ड्रोन यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्खननाशी संबंधित पर्यावरणाचे मुद्दे योग्यरीत्या हाताळता येतात. विकासासाठी खनिज उत्खननाचे लक्ष्य गाठताना तंत्रज्ञानाच्या संयोजनाने खाण क्षेत्रात पर्यावरणाचा परिणाम कमी करता येतो. त्यामुळे खनिज स्थायी आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह बनतील आणि खाणी व खनिज उत्पादनांच्या गुणवत्तेची उच्चपातळी निश्चित गाठता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वटे म्हणाले, भारतात या क्षेत्रात उत्तम प्रोफेशनल्स आहेत तर काही खाणी जागतिक दर्जाच्या आहेत. खाण कंपन्यांनी पर्यावरण फ्रेंड्ली बनावे. पर्यावरण विषय खूपच लवचिक आहे. कारण खाण नियोजन आणि खाण बंद होण्याबाबतच्या योजना योग्य आणि व्यवस्थित झाल्यास हवा, पाणी आणि माती प्रदूषित न करता त्याच्या मूळ टप्प्यात परत येऊ शकते. खाणींनी योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास पर्यावरण प्रमाणपत्र तीन महिन्यांत मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राने खनिज स्रोताच्या इंटर-जनरेशनल इक्विटीवर भर दिला आहे. खाण उद्योगाने यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आर.एस. कळमकर यांनी केले. कालीहारी यांनी आभार मानले. यावेळी आयबीएम, जीएसआय, एमईसीएल, नीरी आणि विविध खाणींचे प्रतिनिधी उपस्थित होते.