मनपाचे आवाहन : नागरिक हो पाणी जरा जपून वापरा, नाहीतर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:49 AM2019-04-20T00:49:16+5:302019-04-20T00:50:13+5:30
उन्हाळ्याचे पुढचे दोन महिने अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याप्रति शहरवासी सजग झाले नाही थेंबे-थेंबे पाण्यासाठी नागरिकांना कठीण जाणार आहे. अशावेळी दररोज घरच्या नळाला येणारे पिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, त्या पाण्याने वाहने धुवू नका, उद्यानात टाकू नका किंवा वाया घालवू नका, असे आवाहन महापालिका तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्याचे पुढचे दोन महिने अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याप्रति शहरवासी सजग झाले नाही थेंबे-थेंबे पाण्यासाठी नागरिकांना कठीण जाणार आहे. अशावेळी दररोज घरच्या नळाला येणारे पिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, त्या पाण्याने वाहने धुवू नका, उद्यानात टाकू नका किंवा वाया घालवू नका, असे आवाहन महापालिका तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूने केले आहे.
दररोज नळाला येणाऱ्या पाण्याने वाहने धुण्याची, ते पाणी कुलरमध्ये, उद्यानातील झाडांवर टाकण्याची किंवा वाया घालविण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये असते. एवढेच नाही तर नळ आल्यानंतर आदल्या दिवशीचे वाचलेले पाणी नालीत किंवा बाहेर फेकण्याचा प्रकारही दिसून येतो. मनपाचे जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यू कंपनीने अशाप्रकारे पाणी वाया न घालविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शिवाय अशाप्रकारे कुणी पाणी वाया घालविताना आढळल्यास त्यांना तसे करण्यापासून थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात होणारे जलसंकट टाळण्यासाठी नागरिकांनी सजग होणे आवश्यक आहे. आज आपण पाणी वाचविले तर असंख्य तहानलेल्यांना ते देता येईल, अशी भावनिक साद घातली आहे. नळाद्वारे येणारे पाणी पूर्णपणे ट्रीट केलेले असते व त्या पाण्याचा उपयोग दोन-तीन दिवस केला जाऊ शकतो. पिण्याचे पाणी कधीही शिळे होत नाही, ही गोष्ट नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे.
शहरात दररोज ६५० मिलियन लिटर (एमएलडी) पाणी आयात केले जाते. पेंच आणि कन्हान नदीमधून पाणी आणल्यानंतर ते योग्यप्रकारे ट्रीट केले जाते. नवेगाव खैरी (पेंच) मधून पश्चिम, दक्षिण-पश्चिम, मध्य नागपुरात तर पूर्व, उत्तर, दक्षिण नागपुरात कन्हान नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पेंचच्या तोतलाडोह जलाशयात सध्या २२.०६ दहा लाख घनमीटर पाणी शिल्लक आहे, जे एकूण क्षमतेच्या केवळ २.१७ टक्के एवढेच आहे. कामठीच्या नवेगाव खैरी जलाशयात ४५.१५ लाख घनमीटर पाणी शिल्लक आहे, जे एकूण क्षमतेच्या ३१.८ टक्के आहे. मागील वर्षाशी तुलना केल्यास तोतलाडोह आणि नवेगाव खैरी जलाशयात गेल्या वर्षी १८ एप्रिलपर्यंत अनुक्रमे १२.४२ टक्के आणि ३९.२९ टक्के पाणी शिल्लक होते.
वर्तमान परिस्थिती पाहता मनपा प्रशासन पिण्याच्या पाण्याबाबत आणि दुरुपयोगाबाबत अधिक सजगतेने पावले उचलताना दिसत आहे. वाहने व कपडे धुण्यासाठी, कुलरमध्ये भरण्यासाठी व उद्यानामध्ये टाकण्यासाठी नळाऐवजी विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याची सूचना मनपा प्रशासनाने केली आहे. खर्च करून ट्रीटमेंट केलेले पाणी वाया जाण्यापेक्षा गरजवंतांना जावे, असे भावनिक आवाहन मनपाने केले आहे.
लिकेज आढळल्यास तक्रार द्या
जलवाहिनीच्या लिकेजबाबत आणि एखाद्या ठिकाणी वाया जात असेल तेव्हा नागरिकांनी तत्काळ ओसीडब्लूच्या १८००२६६९८९९ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय घरातील नळाच्या तोट्या लिकेज असल्यास दुरुस्त करण्याचे व पाणी वाया न घालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.