बौद्धिक वर्गात झाले फक्त संघकार्याचे आवाहन; गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनाची अपेक्षा फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 06:58 PM2017-12-20T18:58:49+5:302017-12-20T19:02:57+5:30
गुजरात विधानसभेतील निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपदेश देण्यात येईल व अपेक्षापूर्ततेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात संघाने या मुद्यांवर ‘बौद्धिक’ देण्याचे टाळले.
योगेश पांडे
नागपूर : गुजरात विधानसभेतील निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महाराष्ट्रातील आमदारांना देण्यात येणाऱ्या उद्बोधन वर्गाला यंदा जास्त महत्त्व आले होते. राज्यातील आमदारांना संघातर्फे उपदेश देण्यात येईल व अपेक्षापूर्ततेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात संघाने या मुद्यांवर ‘बौद्धिक’ देण्याचे टाळले. वर्ग झाल्यानंतर संघाने सखोल मार्गदर्शन केल्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा होती. प्रत्यक्षात केवळ संघकार्याबाबतच येथे माहिती देण्यात आल्याची माहिती संघाच्या विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
सकाळी ८.३० च्या सुमारास आमदार व मंत्री स्मृतिमंदिर परिसरात येण्यास सुरुवात झाली. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांचे चहापान झाले. यानंतर महर्षी व्यास सभागृहात वर्गाला सुरुवात झाली. १५ मिनिटे चाललेल्या या वर्गाला नागपूर महानगर सहसंघचालक व डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे उपाध्यक्ष श्रीधर गाडगे यांनी मार्गदर्शन केले.
संघातर्फे आमदारांना अपेक्षा, कार्यप्रणालीतील सुधार, प्रशासनाचे काम इत्यादीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशीच अपेक्षा होती. आमदारदेखील त्याच तयारीने गेले होते. मात्र प्रत्यक्षात संघाने यावर काहीच भाष्य केले नाही. श्रीधर गाडगे यांनी संघाचे कार्य, डॉ. हेडगेवार स्मारक समितीतर्फे चालणारे काम, संघाचे विविध उपक्रम यांची माहिती दिली. सध्या शासनाची धुरा संघ विचारधारेच्या लोकांच्या हाती आहे. संघाच्या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे संघकार्यात आमदारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्मृतिमंदिरात चालणारे स्पर्धा परीक्षा केंद्र, वनवासी विद्यार्थी छात्रावास, रुग्णोपयोगी सेवा केंद्र, प्राथमिक चिकित्सा केंद्र याबाबतदेखील त्यांनी माहिती दिली.
यावेळी संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार, सहकार्यवाह अतुल मोघे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, महानगर प्रचारक क्षितिज गुप्ता, सहकार्यवाह अरविंद कुकडे, रवींद्र बोकारे, मोहन अग्निहोत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
संघ संविधानानुसार सरकार्यवाहच सर्वोच्च अधिकारी
यावेळी श्रीधर गाडगे यांनी संघातील निवडणुकांबाबत मंत्री-आमदारांना माहिती दिली. १९४८ साली संघावर बंदी आली. मात्र सरकारने ती बंदी उठविण्याचा निर्णय घेतला. परंतु बंदीचे पाऊल मागे घेत असताना सरकारने अट टाकली. संघाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे प्रयत्न केले. ते यशस्वी न झाल्याने संघाचे संविधान लिहिण्याची अट टाकण्यात आली. त्यानुसार दोन पानांचे संविधान लिहिल्या गेले. त्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत, तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात, असे त्यांनी सांगितले.