विकास कामांवरील स्थगितीमुळे आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी सामाजिक संस्थांना आवाहन
By गणेश हुड | Published: March 9, 2023 07:57 PM2023-03-09T19:57:06+5:302023-03-09T19:57:32+5:30
जि.प.च्या आरोग्य समितीचा निर्णय : २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम, दुरुस्ती ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या विचारात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची संख्या कमी आहे. त्यात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी २८ केंद्राची दुरुस्ती वा नवीन बांधकामाची गरज आहे. परंतु शासनाने विकास कामांना स्थगिती दिल्याने निधी अभावी ही कामे ठप्प आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करणे अत्यावश्यक असल्याने आरोग्य केंद्रांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी सामाजिक व सेवाभावी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जि.प.च्या आरोग्य समितीने केले आहे.
मोवाड येथे महापूर आला असताना लोकमत समुहाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम करण्यात आले होते. त्याच धर्तीवर जिल्हयातील प्रतिष्ठित संस्था, सेवाभावी संस्थाकडून आरोग्य केंद्रांची दुरुस्ती व बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन करण्याबाबतचा निर्णय गुरुवारी आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समितीच्या सभापती व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी दिली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्र, ५८ अॅलोपॅथी व आयुर्वेदिक रुग्णालये आहेत. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या ३० लाख आहे. याचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे. दुसरीकडे २८ आरोग्य केंद्रांच्या इमारती नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात गळती लागते. रुग्णावर उपचार करता येत नाही. आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी ७ कोटी ६५ लाखांच्या खर्चाला मंजुरी आहे. जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र स्थगितीमुळे हा निधी अप्राप्त आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही उपलब्ध झालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. याचा विचार करता प्रतिष्ठित संस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
५४ उपकेंद्रांची दुरुस्ती ठप्प
जिल्हयातील ३१६ आरोग्य उपकेंद्रापैकी ५३ उपकेंद्रांच्या इमारती नादुरुस्त आहेत. पावसाळ्यात छताचे पाणी गळते, तर कुठे ओटीची व्यवस्था नाही. इमारती धोकादायक झाल्या आहेत. दुरुस्तीची तातडीची गरज आहे. नादुरूस्त इमारतीमुळे काही उपकेंद्र बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाही शासनाने निधी रोखला आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरवा करूनही निधी मिळत नसल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
जि.प.मुख्यालयात आरोग्य कक्ष
जिल्हा परिषद मुख्यालयात ग्रामीण भागातून येणारे नागरिक, कर्मचारी व अधिकारी यांना वेळप्रसंगी उपचाराची गरज भासते. याचा विचार करता येथे आरोग्य कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे डॉक्टर व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जातील.
नवीन बांधकाम रखडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र
- मांढळ
-अडेगाव
-येनवा
-नगरधन
-तिष्टी
-नवेगाव खैरी
-हिवराबाजार
नवीन बांधकाम रखडलेले आरोग्य उपकेंद्र
-खरसोली
-येणीकाणी
-धामणगाव
-मौदा
-खुबाळा
-खापरखेडा
-उबाळी
-उपरवाही
-कांद्री
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"