सासरा व दीराचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: September 14, 2016 03:19 AM2016-09-14T03:19:29+5:302016-09-14T03:19:29+5:30
कळमेश्वर येथे एका विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण : लैंगिक छळ झाला होता असह्य
नागपूर : कळमेश्वर येथे एका विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने आरोपी सासरा आणि दीराचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
दशरथ गोविंदराव मोहाडे आणि संजय दशरथ मोहाडे, अशी आरोपींची नावे आहेत. स्वाती अरविंद मोहाडे, असे मृत महिलेचे नाव होते. मृत महिलेचे वडील रमेश थोराणे यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून ३ आणि ४ आॅगस्ट २०१६ रोजी दोन्ही आरोपींना अटक केली होती. तक्रारकर्त्यानुसार स्वातीचे लग्न २८ एप्रिल २०१५ रोजी अरविंद दशरथ मोहाडे याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर अरविंद आणि स्वाती हे दोघे नागपुरात फुटाळा तलावनजीक राहत होते. अरविंद मोहाडे याचे गुरु अन्नू बाबा ऊर्फ शेख अन्वर नक्शबंदी याने थोराणे यांची भेट घेऊन स्वातीवर सासरा आणि दीराने बलात्कार केल्याचे त्यामुळे तिची प्रकृती बिघडल्याचे सांगितले होते. लागलीच स्वातीची तिच्या आईने भेट घेतली होती. तिने आईजवळ संपूर्ण कर्मकहाणी सांगितली होती.
रमेश थोराणे यांनी फेब्रुवारीमध्ये आपले जावई अरविंदची भेट घेतली होती. अरविंदने त्यांना दशरथ आणि संजयने स्वातीवर बलात्कार केल्याने तिच्यासोबत संसार करण्यास नकार दिला होता. स्वातीपासून आपणास घटस्फोट पाहिजे, असेही तो म्हणाला होता. सासऱ्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. अरविंदने त्यांना वकिलाकडेही नेले होते. त्यानंतर अरविंद हा एकटाच नागपुरात परतला होता तर स्वाती आपल्या आईसोबत थांबली होती.
फिर्यादी वडिलाच्या माहितीनुसार आरोपी हे स्वातीचा वारंवार नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक छळ करायचे, कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी द्यायचे, वैफल्यग्रस्त होऊन तिने ३० जुलै २०१६ रोजी विषप्राशन केले होते. तब्बल आठ तास मृत्यूशी झुंज देत तिचा मृत्यू झाला होता. दोन्ही आरोपींनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करताच प्रकरण गंभीर असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावले. (प्रतिनिधी)