१०० सार्वजनिक गणेश मंडळांचे अर्ज : सुरक्षेबाबत आयुक्तांनी केली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:39 PM2020-08-20T22:39:34+5:302020-08-20T22:42:39+5:30
कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक तसेच शांतता समितीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमणाचा धोका लक्षात घेत संयमाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. २२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापासून उत्सवाचा मोसम आरंभ होणार आहे. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक तसेच शांतता समितीच्या सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
गणेशोत्सव राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि हे महापर्व १० दिवस चालते. नागपूर शहरातही दरवर्षी शेकडो मंडळे गणेशोत्सवासाठी अर्ज करतात. गेल्या वर्षी हा आकडा ९८३ होता. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे केवळ १०० मंडळांनी श्रींच्या स्थापनेसाठी पोलीस विभागाकडे अर्ज केला आहे. ही संख्या २०० ते २५० पर्यंत जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम करण्यासाठी ही चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या ११ जुलैच्या परिपत्रकानुसार उत्सव साजरा करण्यात येईल, असे शांतता समितीच्या सदस्यांना स्पष्ट करण्यात आले. सार्वजनिक मूर्ती ४ फूट व घरगुती गणेश मूर्ती २ फुटाची राहील. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र गोळा होता येणार नाही. पूजा किंवा आरतीदरम्यान गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. दर्शनाच्या वेळी सॅनिटायझर व मास्क वापरण्यासह शारीरिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील. विसर्जनाची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
कृत्रिम टँकमध्येच करावे लागेल विसर्जन
गणेश मंडळांनाही जवळच्या कृत्रिम टँकमध्येच विसर्जनाची परवानगी असेल. विसर्जनाची समस्या नसावी म्हणून मातीच्या मूर्तीऐवजी धातूची मूर्ती ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक आयोजनालाही बंदी
सार्वजनिक गणेश मंडळातर्फे सांस्कृतिक आयोजन केले जाते पण यावर्षी अशा सर्व आयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी अधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांना उत्सव साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे पालन करण्याचे आवाहन केले. सुरक्षित अंतर ठेवणे आणि गर्दीपासून दूर राहणे हेच कोविडपासून बचावाचे उपाय आहेत. शांतता समितीच्या सदस्यांनी नागरिकांना जागरूक करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. बैठकीत सहपोलीस आयुक्त नीलेश भरणे यांच्यासह सर्व सहआयुक्त व अधिकारी उपस्थित होते.