माती सुपीकता निर्देशांकानुसार खते द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:45+5:302021-05-26T04:09:45+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पिकांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी पिकांना रासायनिक खतांची याेग्य मात्रा ...
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : पिकांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी पिकांना रासायनिक खतांची याेग्य मात्रा देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पिकांच्या मशागतीचे नियाेजन करताना शेतातील मातीच्या सुपीकतेचा निर्देशांक विचारात घेऊन रासायनिक खते द्यावी. त्यासाठी आधी माती परीक्षण करवून घ्यावे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी दिली. त्यासाठी तालुका कृषी विभागाने खरीप पीक नियाेजन आखणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रामटेक तालुक्यात मुख्यत: धान, कपाशी व तूर ही खरीप पिके घेतली जातात. तालुक्यात धानाच्या राेवणीचे २१,५०० हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. धानाच्या उत्पादन वाढीसाठी बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा माेठ्या प्रमाणात व अवाजवी वापर करतात. यामुळे उत्पादन खर्च वाढत असून, उत्पादन स्थिर राहते. शेतकऱ्यांनी माती सुपीकता निर्देशांकानुसार खते वापरल्यास पिकांचा उत्पादन खर्च कमी हाेण्यास व उत्पादन वाढण्यास मदत हाेते, असेही स्वप्निल माने यांनी सांगितले असून, शेतकऱ्यांनी जैविक खते वापरण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी कृषी विभागाच्या वतीने माेहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी खतांचा खर्च कमी करण्यासाठी चार पर्याय सांगितले असून, त्यातील पहिल्या पर्यायात खर्च कमी हाेताे तर तिसऱ्या व चाैथ्या पर्यायात खतांचा खर्च थाेडा वाढत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांचे पहिले दाेन पर्याय निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या साेयीसाठी प्रत्येक गावातील मातीचे परीक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक गावात एक चार्ट तयार केला आहे. या चार्टमध्ये मातीच्या परीक्षणानंतर जमिनीत काेणत्या घटकांची कमतरता आहे, ते तपासून त्याच घटकांची पूर्तता करणाऱ्या खताच्या मात्रांचा ताळमेळ कृषी विभागाने या चार्टमध्ये बसविला आहे. जमिनीचे आराेग्य कायम राखण्यासाठी तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी केले आहे.
...
खतांमधील घटक व प्रति हेक्टरी खर्च
गावातील जमीन सुपीकता निर्देशांकानुसार धानाच्या पिकासाठी नत्र, स्फुरद व पालाशची प्रति हेक्टरी किती किलाे आवश्यकता आहे, त्यासाठी प्रति हेक्टर खतांवर किती खर्च येताे, याची माहिती देताना स्वप्निल माने यांनी सांगितले की, माती परीक्षण करून खतांच्या मात्रांच्या प्रमाणाचे चार पर्याय ठरविण्यात आले आहे. पहिल्या पर्यायात धानाच्या पिकासाठी युरिया, सिंगल फाॅस्फेट व म्युरेट ऑफ पाेटॅश याची किंमत प्रति हेक्टरी ५,७६१ रुपये दुसऱ्या पर्यायात डीएपी, युरिया, म्युरेट ऑफ पाेटॅश याचा खर्च प्रति हेक्टरी ६,४२४ रुपये, तिसऱ्या पर्यायात २०:२०:०:१, युरिया, म्युरेट ऑफ पाेटॅश याचा खर्च ८,९२७ रुपये तर चाैथ्या पर्यायात १०:२६:२६, युरिया, म्युरेट ऑफ पाेटॅशचा प्रति हेक्टरी खर्च ८,२८५.३ रुपये येत असल्याचे त्यांनी सांगितले.