गोदाम बांधकामासाठी १५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज
By गणेश हुड | Published: July 2, 2024 08:42 PM2024-07-02T20:42:15+5:302024-07-02T20:42:29+5:30
अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर लॉटरी पध्दतीने लाभार्थीची निवड करण्यात येईल.
गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (अन्नधान्य) व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हयामध्ये २५० मे.टन प्रती गोदाम क्षमतेचे पाच गोदाम बांधकामांचे उद्दीष्ट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी अशा पात्र इच्छुकांनी १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.
प्रकल्प किंमतीच्या५० टक्के किंवा १२.५० लाख रुपयांपैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. बँकने कर्ज मंजुर केल्यानंतरच अर्जदार या बाबीच्या लाभास पात्र राहील. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचे प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाईन्स, व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर करावा. जिल्हयाला मंजूर लक्षांकापेक्षा जास्त लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरावर लॉटरी पध्दतीने लाभार्थीची निवड करण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात यावेत. अधिक माहितीकरिता मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षकांनी केले आहे.