विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:49+5:302020-12-09T04:06:49+5:30
नागपूर : जि.प. नागपूरअंतर्गत पदवीप्राप्त प्राथमिक शिक्षकांना विषय पदवीधर शिक्षक म्हणून पदस्थापना दिल्या. परंतु तीन वर्षापासून अधिकचा ...
नागपूर : जि.प. नागपूरअंतर्गत पदवीप्राप्त प्राथमिक शिक्षकांना विषय पदवीधर शिक्षक म्हणून पदस्थापना दिल्या. परंतु तीन वर्षापासून अधिकचा कालावधी लोटूनही शिक्षण विभागाच्या दफ्तर दिरंगाईमुळे हे सर्व शिक्षक पदवीधर वेतनश्रेणीपासून वंचित आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार वर्ग ६ ते ८ च्या वर्गाला शिकविण्याकरिता विषयनिहाय पदवीधर शिक्षक नेमणे गरजेचे असल्याने शैक्षणिक सत्र २०१७ व २०१८ मध्ये भाषा, विज्ञान व समाजशास्त्र या विषयाकरिता प्राथमिक शिक्षकांमधील त्या त्या विषयात पदवीधर शिक्षकांना विषय पदवीधर शिक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आल्या होत्या. १३ ऑक्टोबर २०१६ च्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार पदस्थापना देण्यात आलेल्या विषय पदवीधर शिक्षकांपैकी ३३ टक्के शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे क्रमप्राप्त होते. परंतु अजूनपर्यंत या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. अलीकडेच त्यापैकी विज्ञान संवर्गातील शिक्षकांना ही वेतनश्रेणी लागू केली. परंतु भाषा आणि समाजशास्त्र विषयाचे विषय पदवीधर शिक्षक मात्र अजूनही या वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. या सर्व शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह सुरेश श्रीखंडे, हेमंत तितरमारे, विजय जाधव, अनिल वाकडे, अनिल हुमणे, अशोक तोंडे, अनिल श्रीगिरिवार, योगेश राऊत, रामभाऊ धर्मे, विश्वास पांडे, अरविंद डांगे, प्रल्हाद चुटे, जयंत निंबाळकर, जयसिंग साबळे, कमलाकर काळे आदी उपस्थित होते.