मनपा कर्मचाऱ्यांच्या बदली व पदोन्नतीसाठी समिती नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:18 PM2019-07-12T23:18:26+5:302019-07-12T23:19:38+5:30
मनपातील कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश मनपाच्या विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपातील कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश मनपाच्या विधी व सामान्य प्रशासन विशेष समितीच्या बैठकीत सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
समितीचे सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही बैठक मनपा मुख्यालय सिव्हील लाईन्स येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. यावेळी बोलताना सभापती अॅड. मेश्राम म्हणाले की, या समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, विधी व सामान्य प्रशासन समिती प्रमुख अॅड. धर्मपाल मेश्राम, सहायक आयुक्त व विधी अधिकाºयांचाही समावेश करावा. सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नती धोरणाचा आराखडा तयार करावा. त्यावर समिती निर्णय घेईल.
बैठकीत उपसभापती मीनाक्षी तेलगोटे, सदस्य जयश्री वाडिभस्मे, सहायक आयुक्त महेश धामेचा, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी आनंद शेंडे, प्रकाश परडे, सुरज पारोचे व इतर अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या ७० वाहनांवर दरवर्षी २.२५ कोटी रुपये खर्च
यावेळी अॅड. मेश्राम यांनी स्टेशनरीवर दरवर्षी खर्च होणाऱ्या ५० लाख रुपयाच्या खर्चाची सविस्तर माहिती आणि अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या वाहनांची माहिती मागितली. सहायक आयुक्त धामेचा यांनी यावर सांगितले की, ७० वाहनांवर दरवर्षी २.२५ कोटी रुपये खर्च होतात. तसेच स्टेशनरीचा पुरवठा हा मागणीप्रमाणे केला जातो. मनपात सध्या १६० कॉम्प्युटर ऑपरेटर कार्यरत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
८२ टक्के प्रकरणाचा निकाल मनपाच्या बाजुने
विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांनी विधी विभागाची माहिती देताना सांगितले की, यावर्षी ११८ प्रकरणांवर विविध न्यायालयात निकाल देण्यात आला आहे. यापैकी ८२ टक्के प्रकरणांचा निर्णय मनपाच्या बाजूने लागला आहे. सभापती अॅड. मेश्राम यांनी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर लक्ष देण्याचे निर्देश दिले.