डेप्युटी सीएफआयची नियुक्ती तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:46+5:302021-03-01T04:08:46+5:30
नागपूर : विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये डेप्युटी चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर (सीएफआय) नियुक्तीची प्रक्रिया वेगात पूर्ण करा, असा ...
नागपूर : विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये डेप्युटी चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर (सीएफआय) नियुक्तीची प्रक्रिया वेगात पूर्ण करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.
राज्य सरकारने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये बदलण्यात आलेल्या नियमांतर्गत डेप्युटी चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर हे नागपूर फ्लाईंग क्लबचे प्रमुख होऊ शकतात. त्यामुळे चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर नियुक्तीची गरज नाही. डेप्युटी चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर नियुक्तीसाठी २२ जानेवारी २०२१ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हे पद भरण्यात आल्यानंतर नागपूर फ्लाईंग क्लब कार्यान्वित करण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाणार आहे. याशिवाय नागपूर फ्लाईंग क्लबमधील रिक्त अन्य आठ अनिवार्य पदे भरून उमेदवारांना नियुक्तीपत्रे जारी करण्यात आली आहेत. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सदर आदेश दिला व पुढील कामाचा आढावा सादर करण्यासाठी सरकारला २४ मार्च ही तारीख दिली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात सुमेधा घटाटे व इतरांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. नागपूर फ्लाईंग क्लब तातडीने कार्यान्वित करण्याची त्यांची मागणी आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. श्रीनिवास देशपांडे तर, सरकारतर्फे ॲड. एन. आर. पाटील यांनी कामकाज पाहिले.