नागपूर महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:20 PM2018-04-21T15:20:16+5:302018-04-21T15:20:34+5:30
महापालिकेत लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली. महापौर नंदा जिचकार यांनी याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या तातडीने करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत केली. महापौर नंदा जिचकार यांनी याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिेले.
समितीच्या शिफारशीनुसार २००३ -०४ मध्ये ८३० लोकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिली. सध्या ६०० हून अधिक अर्ज आलेले आहेत. ४५० पदे रिक्त आहेत. छाननी केली जात आहे. तातडीने नियुक्त्या करण्यात येतील.असे त्यांनी सांगितले. धरमपाल मेश्राम यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारस असलेल्या मुलींनाही सेवेत घेण्याची सूचना केली. दयाशंकर तिवारी, प्रवीण दटके , काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे आदींनी नियुक्तीला विलंब होत असल्यावर प्रकाश टाकला.
इंदिरा गांधी रुग्णालयातील जैविक कचऱ्याची चौकशी
इंदिरा गांधी रुग्णालयात उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या जैविक कचऱ्याचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून प्रफुल्ल गुडधे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते. यावर उत्तर देताना आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, गेल्या काही दिवसापूर्वी आरोग्य शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी आवश्यक दिशानिर्देश दिले होते. त्यानुसार इंदिरा गांधी रुग्णालयात उघड्यावर जैविक कचरा टाकला जात असेल तर या प्रकरणात नोटीस बजावून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
१६ कर्मचाऱ्यांना घेणार सेवेत
मुलाखत न घेता निवड करणे, अर्ज फेटाळल्यानंतरही निवड करणे अशा आरोपामुळे सेवेतून काढण्यात आलेल्या १६ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला़ विशेष म्हणजे मानवीय दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला़ सेवेत घेण्यात यावे, यासाठी हे १७ कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करीत होते़ ते शासनाकडे दाद मागण्यासाठी केले़ शासनाने महापालिकेला आपल्या स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले होते़ त्यानुसार मनपाच्या सामाान्य प्रशासन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे़ या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली़ १७ पैकी एका कर्मचाऱ्यांचा मृत्य झाला आहे़
हलबा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका
महानगरपालिकेतील २०० हलबा कर्मचाऱ्यांना जाती प्रमाणपत्र सादर करण्याकरिता नोटीस देण्यात आल्या आहेत़ प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना सेवामुक्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ हे कर्मचारी कित्येक वर्षापासून महापालिकेच्या सेवेत आहेत़ महापालिकेने १७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याचप्रमाणे हलबा कर्मचाऱ्यांनाही मनपाने अभय द्यावे, अशी मागणी अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी केली़ महालिका हलबा कर्मचाऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी सांगितले.