‘धुवां धुवां’ अन् ‘भागमभाग’; नवनियुक्त शहराध्यक्षांच्या पदग्रहणात विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:45 AM2019-06-24T09:45:22+5:302019-06-24T09:46:04+5:30
‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रमदेखील आगळावेगळाच ठरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी ओळख असलेल्या भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रमदेखील आगळावेगळाच ठरला. खासदार, आमदारांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यालयातील सभागृहात ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. काही क्षणातच सगळीकडे धूर पसरल्यामुळे कार्यकर्त्यांची एकच पळापळ झाली. यावेळी पक्षाच्या काही नेत्यांनी समयसूचकता दाखविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली व यात कुणालाही इजा झाली नाही.
सायंकाळी ६.३० च्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. पक्ष कार्यालयातील पाचव्या माळ्यावरील सभागृहात कार्यक्रम होता. बाहेर पाऊस असतानादेखील क्षमतेहून जास्त कार्यकर्ते पोहोचले होते. आ.सुधाकर कोहळे यांचे भाषण संपल्यावर आ.सुधाकर देशमुख यांचे भाषण सुरू झाले. अचानक एका ‘इलेक्ट्रीकल कंट्रोल बॉक्स’मधून जोरदार आवाज आला व काही क्षणांतच ‘शॉर्टसर्किट’मुळे तेथून ठिणग्या निघायला लागल्या. एकाच मिनिटांत त्या बॉक्सला आगीने वेढले व सभागृहात धूर पसरला. सभागृहातून बाहेर निघायला दोनच दरवाजे होते व खाली जायला एकच जिना होता. अचानक झालेल्या या घटनेमुळे कार्यकर्त्यांची पळापळ झाली. यात महिलांचादेखील समावेश होता. यात काही जण खुर्च्यांना अडकून खाली देखील पडले. त्यातच इमारतीचे लाईट गेल्यामुळे तर फारच गोंधळ उडाला.
दुसरीकडे खासदार विकास महात्मे, आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनादेखील सुरक्षितपणे इमारतीच्या बाहेर नेण्यात आले. दरम्यान, काही पदाधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत कुणालाही ‘लिफ्ट’मधून जाऊ दिले नाही व सर्वांना खाली जाण्याचा मार्ग दाखविला. सोबतच आग विझविण्याचेदेखील प्रयत्न केले. काही वेळातच अग्निशमन दलाचे पथकदेखील पोहोचले व परिस्थितीत नियंत्रणात आली.
मोबाईलच्या प्रकाशात झाले अध्यक्षांचे भाषण
कार्यकर्त्यांची पळापळ झाल्यानंतर सर्व जण इमारतीच्या बाहेरील मोकळ्या जागेत जमले. कुठल्याही स्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा हा विचार प्रवीण दटके यांनी पदाधिकाºयांना बोलून दाखविला. सर्व जण खाली सुरक्षित आले आहेत याची खातरजमा झाल्यानंतर तेथेच पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळीकडे अंधार असताना मोबाईल फोनमधील टॉर्चच्या प्रकाशात दटके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
खरोखरच कार्यक्रम ठरला ऐतिहासिक
आ.सुधाकर कोहळे व आ.सुधाकर देशमुख यांनी पदग्रहणाचा हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे उद्गार भाषणादरम्यान काढले होते. यानंतर लागलेल्या आगीमुळे एकच पळापळ झाली. खरोखरच हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.