सीए मिलिंद कानडे यांची नेपा लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 21, 2023 07:05 PM2023-06-21T19:05:40+5:302023-06-21T19:06:00+5:30
भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून त्यांना त्यासंदर्भात आदेश प्राप्त झाला असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी राहणार आहे.
नागपूर- प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सीए मिलिंद कानडे यांची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुनी आणि महत्त्वपूर्ण न्यूज प्रिंट कंपनी नेपा लिमिटेडच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून त्यांना त्यासंदर्भात आदेश प्राप्त झाला असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी राहणार आहे.
मिलिंद कानडे हे नागपुरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटट असून १९९६ सालापासून ते व्यवसायात आहेत. २७ वर्षांच्या या कार्यकाळात त्यांनी कारखाने उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आजपर्यंत भारतभरात सुमारे २०० कारखान्यांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव ध्यानात घेऊन भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयाने नेपा लिमिटेडच्या विकासासाठी मिलिंद कानडे यांची ही नियुक्ती केली आहे. फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भ, बुटीबोरी मॅन्युफॅक्टचरर्स असोसिएशन या औद्यागिक संस्थामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश आर्थिक आघाडीचे ते अध्यक्ष असून भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ता आहेत. त्यांनी या नियुक्तीचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आदींना दिले आहे.