दहावी व बारावी परीक्षेसाठी दक्षता पथकाची नियुक्ती
By आनंद डेकाटे | Published: July 19, 2023 06:17 PM2023-07-19T18:17:47+5:302023-07-19T18:18:07+5:30
परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना आळा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची दक्षता पथकात नियुक्ती
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) लेखी परीक्षा १८ जुलैपासून सुरू झाली आहे. ती ८ ऑगस्टपर्यंत तर दहावीची परीक्षा १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तसेच आय.टी. व जी.के. विषयाची ऑनलाईन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना आळा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची दक्षता पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
दक्षता पथकामध्ये उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी पुजा पाटील, नायब तहसिलदार सोनाली पुल्लरवार, नायब तहसीलदार अमित निंबाळकर आणि नायब तहसीलदार प्रतिभा लोखंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. नियुक्त दक्षता पथक नागपूर जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर महत्वाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना भेटी देत गैरप्रकारांना प्रतिबंध घालणार आहेत.