अनुकंपाच्या ६१ उमेदवारांना तत्काळ दिले नियुक्तीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:09 AM2021-09-23T04:09:09+5:302021-09-23T04:09:09+5:30
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेकडील ६१ अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बुधवारी काढलेत. ...
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेकडील ६१ अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बुधवारी काढलेत. गेल्या आठ वर्षांपासून या नियुक्त्या रखडलेल्या होत्या. समुपदेशनाने ही प्रक्रिया पार पाडत असताना उमेदवाराने नियुक्तीचे ठिकाण निश्चित करतानाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ नियुक्तीचे आदेश हातात दिले.
जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विविध कार्यालयात पारदर्शी पद्धतीने रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्त्या देण्यात आल्या. जी पदे भरण्यात आली त्यामध्ये वरिष्ठ सहायक - २, कनिष्ठ सहायक -२३, कनिष्ठ सहायक (लेखा) - १०, शिक्षण सेवक - १२, कंत्राटी ग्रामसेवक - १०, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - १, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -२, अंगणवाडी पर्यवेक्षिका - १ अशा ६१ पदांचा समावेश आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) अनिल किटे यांची उपस्थिती होती. पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपअभियंता यांत्रिकी निलेश मानकर उपस्थित होते. विशेष म्हणजे काहीच महिन्यांपूर्वी ६८ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्यात आले होते. नियुक्त्या देऊन पीडित परिवाराला न्याय दिल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी आभार मानले आहे.