न्यायालयात टाळ्या, संतापाला वाट
By admin | Published: February 5, 2016 02:17 AM2016-02-05T02:17:42+5:302016-02-05T02:30:02+5:30
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित युग चांडक अपहरण व खून खटला सुमारे दोन वर्षे चालला. खटल्याच्या एरवी सुनावणीच्या वेळी न्यायालयातील वातावरण धीरगंभीर असायचे.
अखेर न्याय : युग चांडकच्या मारेकऱ्यांना दुहेरी फाशी, महिलेने नराधम राजेशला बदडले
नागपूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित युग चांडक अपहरण व खून खटला सुमारे दोन वर्षे चालला. खटल्याच्या एरवी सुनावणीच्या वेळी न्यायालयातील वातावरण धीरगंभीर असायचे. पाणावलेल्या नजरेने अनेकजण न्यायाची आस ठेवून असायचे. शेवटी गुरुवारी सत्र न्यायालयाने दोन्ही नराधमांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावताच खचाखच भरलेल्या न्यायालयात टाळ्यांचा गजर होऊन न्यायाचे स्वागत करण्यात आले. निर्णयानंतर न्यायालयाच्या बाहेर पडताना एका महिलेने सातव्या मजल्यावरील जिन्याजवळ मुख्य आरोपी राजेश दवारे याच्या कानशिलात लगावून त्याने केलेल्या क्रूर कृत्याप्रति समाजमनात दडलेल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. आज न्यायालयानेही न्याय केला व आजवर धीरगंभीर राहिलेल्या समाजानेही. निकालानंतर राजेश दवारेच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत नव्हता. तो निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा दिसत होता. मात्र अरविंद रडला होता.
मुकेश चांडक कोसळले
निकालानंतर न्यायालयातच युगचे वडील डॉ. मुकेश चांडक बेशुद्ध होऊन खाली कोसळले. यामुळे एकच धावपळ निर्माण झाली. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल कोटेचा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सावरले. न्यायालयातील वकील आणि पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर आणले. दोन मिनिटानंतर ते शुद्धीवर आले होते. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
न्यायालय आवारात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ११ वाजता दोन्ही आरोपींना एका मोठ्या बंद लॉरीतून कारागृहातून न्यायालयात आणले होते. ही लॉरी थेट न्यायालयाच्या आवारात आणण्यात आली होती.
जयस्वाल यांना रिवॉर्ड
या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करून पुराव्याची साखळी निर्माण करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक सत्यरानायण जयस्वाल आता निवृत्त झाले असून, ते औरंगाबादला राहतात. कोर्टाने निकाल दिल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पुण्यातून त्यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांनी त्यांना उत्कृष्ट तपासाबद्दल पाच हजारांचा रिवॉर्ड घोषित केला.
अन् ते कोर्टातच मूर्च्छित पडले
दोनो हत्यारोंको फांसी की सजा सुनायी गयी...!! असे डॉ. मुकेश चांडक यांंनी पत्नीला सांगितले आणि त्यांना भोवळ आली. कोर्टातच ते मूर्च्छित पडले. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास ते घरी पोहोचले. त्यांना पाहून प्रेमल यांच्या भावना भरून आल्या. त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या. त्यांना शांत करण्यात बराच वेळ लागला. यानंतर डॉ. मुकेश आणि पे्रमल यांनी पुन्हा युग प्रकरणाशी संबंधित अनेक पैलू उलगडले.
अन् पोलिसांना धागा गवसला
घटनेच्या दिवशी राजेशने सायंकाळी एका गोंडस मुलाला घरी आणले होते. त्यावेळी त्याचा एक मित्रही सोबत होता, असे राजेशच्या मामीने पोलिसांना सांगितले. त्याच क्षणी पोलिसांनी राजेशला पुन्हा ठाण्यात नेऊन त्याची कडक चौकशी केली, नंतर हा क्रूरकर्मा फुटला. त्याने युगच्या अपहरणाची कबुली दिली. त्याला कुठे ठार मारले अन् कुठे त्याचा मृतदेह लपवून ठेवला, ते सुद्धा सांगितले. गुन्ह्यात अरविंद सिंग सहभागी असल्याचीही कबुली दिली, नंतर मृतदेहही काढून दाखवला. राजेश अन् अरविंदचा निर्दयीपणा पोलिसांनाही अस्वस्थ करणारा होता.
युग प्रकरणावर सिनेमा काढायचाय
कोर्ट फैसला करणार असल्याचे कळाल्याने पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल बुधवारी सकाळीच नागपुरात आले. दोन्ही दिवस ते कोर्टात हजर होते. राजेश दवारेने त्यांनाही एकदा कोर्टाच्या आवारात ‘तेरा स्पॉट लगाऊंगा’ अशी धमकी दिली होती. निकालानंतर जयस्वाल यांनी आनंद व्यक्त केला. लकडगंज पोलीस ठाणे गाठले. तेथे लोकमतशी बोलताना त्यांनी ‘आय अॅम हॅप्पी’ अशी प्रतिक्रिया नोंदवली. युगचे प्रकरण फारच संवेदनशील होते. अशी क्रूरता आपण आपल्या कारकीर्दीत बघितली नव्हती. त्यामुळे आपणही थरारलो होतो, असे सांगतानाच युगवर आपण एक मराठी सिनेमा काढण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले.
गुरुवंदनात युगच्या आठवणी जिवंत
आजच्या निकालाने छाप्रूनगरातील गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये पुन्हा एकदा युगच्या आठवणी जिवंत केल्या. तेथील सर्वच सहनिवासी आज काहीसे आनंदीत झाले. युगला संपविणाऱ्या दोन्ही नराधमांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर आम्हाला दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया तेथील महिला-पुरुषांनी दिली.
तर, या सहनिवासातील ज्येष्ठ नागरिक आणि युगला अंगाखांद्यावर खेळविणारे जेठलाल माहेश्वरी यांनी ‘थोडासा दिलासा मिळाला’ अशी मोजकी प्रतिक्रिया दिली. शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असेही ते म्हणाले.
आरोपींचा गुन्हेगारी अहवाल
राजेश आणि अरविंदचा गुन्हेगारी अहवाल पोलिसांच्या रेकॉर्डवर नाही. मात्र, या दोघांनी अन्य दोन मित्रांसोबत कटकारस्थान करून चारही जणांच्या मालकांना (जेथे काम करतात, त्या प्रमुखाला) लुटण्याचा कट रचला होता. दोघांकडे तसा प्रयत्नही केला होता. मात्र, ते अपयशी ठरले. डॉ. चांडक किमान पाच कोटींची खंडणी देतील, असा त्यांना विश्वास होता. त्याचमुळे दोघांनी नकार देऊनही राजेश आणि अरविंदने झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेने निरागस युगचा बळी घेतला.
कुठल्याही आईवडिलांची अशी तडफड होऊ नये
१९९९ला अर्जुनी मोरगाव सोडून नागपुरात आलो. त्यावेळी पोलीस, कोर्टकचेरी, मीडियाचा असा सामना करण्याची दुर्दैवी वेळ येईल, असे वाटले नव्हते. युग प्रकरणामुळे आम्ही खूप तडफडलो, दुसऱ्या कुण्या आईवडिलांची अशी तडफड होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. युगसारखी मुले गुन्हेगारांची ‘सॉफ्ट टार्गेट‘ असतात. त्यामुळे आता दरवर्षी चाईल्ड अवेअरनेस कॅम्प घेऊ, शाळा-शाळांमध्ये जनजागरण करू, असा मानस चांडक दाम्पत्याने व्यक्त केला.
मामीनेच दिली तपासाला दिशा
नागपूर : युग चांडकचे अपहरण खंडणीसाठी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अक्षरश: हादरले होते. त्यांनी अनेक सराईत गुन्हेगारांची धरपकड चालवली होती. २४ तास झाले तरी मोठे गुन्हेगार, खबरे यांच्याकडून पोलिसांना कसलीच माहिती कळत नसल्याने साऱ्यांच्याच हृदयाची धडधड वाढली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी शहरातील सर्व उपायुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कोतवाली ठाण्यात बैठक घेतली. त्यानंतर पुढे आलेल्या कल्पनेतून पोलिसांनी आता डॉ. चांडक यांच्याकडे काम करणाऱ्या एकेकाची चौकशी केली. राजेश दवारेलाही उचलून आणले. मात्र, त्याने चक्क कानावर हात ठेवले. त्याची शरीरयष्टी अन् वय लक्षात घेता पोलिसांनाही त्याच्यावर संशय आला नाही. सर्वच कर्मचाऱ्यांच्या घराच्या आजूबाजूला चौकशी करणाऱ्या पोलिसांनी राजेश दवारेच्या घराच्या आजूबाजूच्यांनाही विचारणा केली. लकडगंजचे तत्कालीन ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल, सहायक निरीक्षक एस. डी. निकम, आर. जी. राजुलवार, एएसआय अरविंद चव्हाण, तेजराम देवळे, रत्नाकर मेश्राम,अजय रोडे, राजेंद्र बघेल, संजय कोटांगळे, प्रवीण गाणार, सतीश पांडे, संतोष गुप्ता, सुबोध खानोरकर, राजेश डेकाटे, हेमंत पराते, प्रवीण राठोड, अनिल अंबादे, श्याम अंगुरलेवार आदींसह अनेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी युगचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत होते. सध्याचे ठाणेदार सत्यपाल माने यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण राहिली.