राज्यात मनरेगाच्या ३५ हजार कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:41 PM2020-04-16T21:41:33+5:302020-04-16T21:51:46+5:30
शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी सध्या संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची उपाययोजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या या घटकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यात नागपूर विभागातील ५,२५८ कामांचा समावेश आहे.
केंद्र शासनाने सोशल डिस्टन्सिंग विषयक निर्देशाचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जलसंधारण, सिंचन विहिरी ,पशुंसाठी गोठ्यांचे बांधकाम, व्हर्मी कंपोस्ट, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरूपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे घेणे सुलभ झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए. एस. आर नायक यांनी दिली.
खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कामाच्या जलसंधारणाची तसेच सिंचन विहिरींची कामे प्राधान्याने सुरू करावी यासाठी जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी गावनिहाय मंजूर झालेल्या कामांचे नियोजन करून त्यानुसार तालुका व ग्रामीण स्तरावर प्रत्यक्ष काम सुरू होईल या दृष्टीने नियोजन करावे यासाठी लाभार्थ्यांशी व्यक्तीश: संपर्क साधावा अशा सूचना मनरेगा आयुक्त नायक यांनी दिल्या आहेत.
कृषीसंलग्न वैयक्तिक कामांना प्राधान्य
ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत कामे सुरू करताना कृषीसंलग्न अशा वैयक्तिक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये ४,२०८ सिंचन विहिरी, ५,३०४ पशुगोठे, ८,३६६शोकपीट तसेच शेततळी, विहीर पुनर्भरण आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
नागपूर विभागातील मंजूर जिल्हानिहाय कामांची संख्या
चंद्रपूर ६३६
गडचिरोली १,६३८
गोंदिया १,६५८
नागपूर ६०५
वर्धा ६६५
भंडारा २,०५६