आॅटोरिक्षा परवानासाठी शिक्षणाची अट रद्द
By admin | Published: October 30, 2015 02:57 AM2015-10-30T02:57:32+5:302015-10-30T02:57:32+5:30
राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणास्तव परिवहन विभागाने रद्द केले होते.
परिवहन विभागाचे आदेश : नूतनीकरणासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत संधी
नागपूर : राज्याच्या विविध शहरांमधील सुमारे दीड लाख आॅटोरिक्षांचे परवाने अनेक कारणास्तव परिवहन विभागाने रद्द केले होते. या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु याला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने यातील आठवी पास शिक्षणाची अट रद्द केली आहे. याचा फायदा नागपूर शहर व ग्रामीण भागातील दोन हजारावर आॅटोरिक्षा परवानाधारकांना होण्याची शक्यता आहे.
राज्यात सद्य:स्थितीत ७ लाख २६ हजार आहेत. यातील १ लाख ४० हजार ६५ आॅटोरिक्षांचे परवाने परिवहन विभागाने रद्द केले आहेत. त्यांच्या नूतनीकरणाचा आग्रह आॅटोरिक्षा चालक संघटनांनी धरला होता. अखेर परिवहन विभागाने आपले जुने आदेश मागे घेत परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे नवे आदेश काढले. परवाना नूतनीकरणाची शेवटची मुदत ३१ आॅक्टोबर देण्यात आली होती, परंतु आता ती वाढवून १६ नोव्हेंबर २०१५ करण्यात आली आहे.
परिवहन आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार या तारखेपर्यंत परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नाही तर त्यांचे परवाने कायमचे रद्द होणार आहेत. ही कारवाई २३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. याशिवाय परवाने नूतनीकरण न करता वापरल्या जाणाऱ्या तसेच परवानाशिवाय अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांची तपासणी मोहिम हाती घेण्याचेही आदेश देण्यात आले आहे. या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
नागपूर विभागाची जबाबदारी अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)