नागपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांना ३१ मार्च पूर्वी मंजुरी द्या

By योगेश पांडे | Updated: February 6, 2025 20:12 IST2025-02-06T20:12:50+5:302025-02-06T20:12:50+5:30

पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देश

Approval of pending water supply schemes in Nagpur district before March 31 says Chandrashekhar Bawankule | नागपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांना ३१ मार्च पूर्वी मंजुरी द्या

नागपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांना ३१ मार्च पूर्वी मंजुरी द्या

नागपूर : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत काही पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहे. या सुधारित योजनांना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ३१ मार्च अगोदरच मंजुरी द्यावी, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नागपूर जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांबाबत बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी आढावा घेताना हे निर्देश दिले.

या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, राज्य पाणी व स्वच्छता अभियानचे संचालक ई. रविंद्रन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूरचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ उपस्थित होते. प्रलंबित असलेल्या विविध पाणी पुरवठा योजना तातडीने आणि दर्जेदाररित्या पूर्ण करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर मार्फत पाणी वितरणाचे सुयोग्य नियोजन करावे असे बावनकुळे यांनी सांगितले.

जल जीवन अभियानांतर्गत आठ सुधारित योजनांपैकी तीन योजनांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित पाच योजनांना पाणी पुरवठा विभागाने ३१ मार्च पूर्वी मंजुरी देण्याचा सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रस्तावित अतिरिक्त पाणी पुरवठा योजनांना देखील निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी पुरवठा योजनांची सुरू असलेली कामे दर्जेदाररित्या पूर्ण होणे आवश्यक आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य पाणी व स्वच्छता अभियान मार्फत तातडीने उपलब्ध करून देण्याती यावे. हा निधी केंद्र सरकार मार्फत मिळणार असून तो प्राप्त होताच वितरित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Approval of pending water supply schemes in Nagpur district before March 31 says Chandrashekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.