विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीला तत्त्वत: मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:11 AM2021-06-16T04:11:25+5:302021-06-16T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यामुळे कोरोना काळात हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२१ च्या परीक्षांचे शुल्क भरले आहे. त्यामुळे त्यांना हिवाळी २०२१ च्या परीक्षांसाठी शुल्क भरावे लागणार नाही अशी तरतूद करावी, अशी मागणी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली.
कोरोनामुळे नागपूर विद्यापीठाकडून ऑनलाईन माध्यमातून परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे. ऑफलाईनच्या तुलनेत ऑनलाइन परीक्षांचा खर्च कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती खालावली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना परीक्षा शुल्क भरणे कठीण होत आहे. विद्यापीठाचा परीक्षेवरील खर्च निम्म्याने कमी झाला आहे. उत्तरपत्रिका प्रकाशित करणे, मूल्यांकन, परीक्षा केंद्रांचा खर्च याचीदेखील बचत झाली आहे, शिवाय मूल्यांकनासाठी येणाऱ्या प्राध्यापकांना टीए, डीए देण्यात यायचा, तोही कमी झाला आहे. मात्र, तरीही विद्यापीठाकडून अगोदर इतकेच परीक्षा शुल्क घेण्यात येत आहे. यासंदर्भात काही सिनेट सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सिनेट सदस्य तसेच अभाविपसारख्या विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाने परीक्षा शुल्कात कपात करावी, अशी मागणी लावून धरली होती.
यासंदर्भात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विष्णू चांगदे यांच्यासह इतर सदस्यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, एका सत्राचे शुल्क माफ करण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ केले तर कोणत्याही विद्यार्थ्याला दुहेरी फायदा व्हायला नको, इत्यादी बाबींचा अभ्यास करून शुल्कमाफीसंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्यांची समिती गठित करण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
महाविद्यालयील शुल्कमाफीसाठीदेखील समिती
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे शुल्क भरणेदेखील कठीण झाले आहे. ट्युशनसह विकास शुल्कदेखील घेतले जाते. हे शुल्क कमी कसे करता येईल व विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल, यासंदर्भातील तत्त्व ठरविण्यासाठीदेखील संबंधित समिती काम करणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी दिली.