नागपूरच्या मेयो इस्पितळामध्ये सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 09:21 PM2017-11-28T21:21:09+5:302017-11-28T21:28:13+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही(मेयो)आता प्लास्टिक सर्जरीपासून ते ‘युरोसर्जरी’, ‘सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी’आदी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. मंगळवारी शासनाने मेयोच्या या सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी दिली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही(मेयो)आता प्लास्टिक सर्जरीपासून ते ‘युरोसर्जरी’, ‘सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी’आदी महत्त्वाच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. मंगळवारी शासनाने मेयोच्या या सुपर स्पेशालिटी विभागाला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या विभागात सेवा देणारे सर्व मेयोचे माजी विद्यार्थी असून, ते नि:शुल्क सेवा देणार आहेत. या अतिविशेषोपचार तज्ज्ञांना शासनाने सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती दिली आहे.
गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या मेयोमध्ये दिवसेंदिवस रुग्णांचा व्याप वाढत आहे. रुग्णालयात आवश्यक उपचार, तातडीच्या व गंभीर स्वरूपातील शस्त्रक्रिया होत असल्या तरी अंत:स्रावशास्त्र(इन्डोक्रिनॉलॉजी),मूत्रशल्यचिकित्साशास्त्र(युरोसर्जरी), पचनसंस्थाशल्यचिकित्साशास्त्र(सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी),सुघटनशल्यचिकित्साशास्त्र(प्लास्टिक सर्जरी),मूत्रपिंडचिकित्साशास्त्र (नेफ्रालॉजी),कर्करोग विज्ञानशास्त्र(आॅन्कॉलॉजी) ही अतिविशेषोपचार विभाग(सुपर स्पेशालिटी)नव्हते. यामुळे या रुग्णांना मेडिकल किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागायचे. येथे आधीच रुग्णांची गर्दी त्यात मेयोच्या रुग्णांची भर पडायची. यातच प्रत्येक विभागाचे दिवस ठरलेले असल्यामुळे रुग्णांची गैरसोय व्हायची. उपचारात उशीर होण्याची शक्यता असायची. याची दखल मेयोच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतली. गरीब रुग्णांना अतिविशेषोपचार मिळावा यासाठी पुढाकार घेतला. सात विषयात नि:शुल्क सेवा देण्याचा प्रस्ताव मेयो प्रशासनाच्या पुढाकाराने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. शासनाने नि:शुल्क सेवा देण्याच्या अटीवर सेवा देणाऱ्या अतिविशेषोपचार तज्ज्ञांना सहायक प्राध्यापक नियुक्ती करून या योजनेलाच मंजुरी दिली.
या विषयांची मिळेल सेवा
अंत:स्रावशास्त्र(इन्डोक्रिनॉलॉजी),मूत्रशल्यचिकित्साशास्त्र(युरोसर्जरी),पचनसंस्थाशल्यचिकित्साशास्त्र(सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी), सुघटनशल्यचिकित्साशास्त्र(प्लास्टिक सर्जरी),मूत्रपिंडचिकित्साशास्त्र(नेफ्रालॉजी), कर्करोग विज्ञानशास्त्र (आॅनकॉलॉजी) आदी विषयांतर्गत येणाऱ्या रुग्णांना ही अद्ययावत सेवा मिळणार आहे.
हे अतिविशेषोपचार तज्ज्ञ देतील सेवा
मेयोमध्ये डीएम इन्डोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. शैलेश पितळे, एमसीएच युरोसर्जरी डॉ. सदाशिव भोळे, एमसीएच सर्जिकल गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. सुधीर टोमे, एमसीएच प्लास्टिकसर्जन डॉ. समीर जहागीरदार, डीएम नेफ्रालॉजिस्ट डॉ. आश्विन खांडेकर, डीएम आॅन्कॉलॉजिस्ट डॉ. अमोल डोंगरे व डॉ. रिया बल्लीकर आदी अतिविशेषोपचार तज्ज्ञ आपली सेवा देणार आहेत.
सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुवर्ण सुरुवात
सुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. याचा एक भाग म्हणून मेयोमध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. याला मंजुरी मिळाल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा मिळेल.
-डॉ. रवी चव्हाण
नोडल अधिकारी, मेयो