मंजुरी मिळाली, दुरुस्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:12 AM2020-12-05T04:12:53+5:302020-12-05T04:12:53+5:30
रामटेक : रामटेक-काचूरवाही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंतप्रधान सडक याेजनेकडे वर्ग करण्यात आला आहे. या राेडच्या दुरुस्तीला मंजुरीही देण्यात ...
रामटेक : रामटेक-काचूरवाही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पंतप्रधान सडक याेजनेकडे वर्ग करण्यात आला आहे. या राेडच्या दुरुस्तीला मंजुरीही देण्यात आली. परंतु, कामाला सुरुवात करण्यात आली नाही. निधीअभावी दुरुस्तीचे काम रखडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी खासगीत बाेलताना दिली.
काचूरवाही हे रामटेक तालुक्यातील महत्त्वाचे व माेठे गाव आहे. रामटेकहून भंडाऱ्याला जाणारा शाॅर्टकट मार्ग याच गावातून जाताे. शिवाय, काचूरवाही येथील नागरिक बाजार, शासकीय व इतर कामांसाठी तसेच विद्यार्थी शिक्षणासाठी या मार्गाने रामटेकला नियमित ये-जा करतात. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागते. खड्डे चुकवून मार्गक्रमण करताना किंवा खड्ड्यातून वाहन गेल्यास अपघातही हाेतात. पावसाची सर काेसळल्यास या राेडला डबक्याचे स्वरूप प्राप्त हाेते.
या राेडच्या दुरुस्ती मंजुरी मिळाली असल्याचे पंतप्रधान सडक याेजनेचे अधिकारी सांगतात. परंतु, निधी न मिळाल्याने कामाला सुरुवात करणे शक्य झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त हाेत असून, ताे मिळणार कधी आणि कामाला सुरुवात हाेणार कधी याबाबत सध्यातरी अनिश्चितता आहे. स्थानिक लाेकप्रतिनिधींनी याची दखल घेत या कामाला गती द्यावी, अशी मागणी काशिनाथ नाटकर, सुखदेव बावनकुळे, सुनील डाेकरीमारे, शुभम कामडे, मसूर काेल्हे, नरेंद्र सहारे, राेशन देशमुख, शुभम कांबळे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
--
अपघातात जखमी
या मार्गावरील खड्ड्यांमुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात काचूरवाही येथील रामू बावनकुळे गंभीर जखमी झाले हाेते. या मार्गावरील काचूरवाही ते संग्रामपूरपर्यंत खड्ड्यांमधून वाट काढावी लागते. शेतकरी शेतमालाची ने-आण करण्यासाठी याच राेडचा वापर करतात. राेडवरील खड्ड्यांचा काचूरवाही साेबतच संग्रामपूर, हाताेडी, चाेखाळा, खंडाळा, खाेडगाव येथील विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागताे.